लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी नुकतंच मतदान पार पडलं. या टप्प्यासह महाराष्ट्रातील सर्व टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं आहे. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी कमी राहिल्याचं दिसून आलं आहे. त्यासंदर्भात राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करत असताना दुसरीकडे देशपातळीवर अजून दोन टप्प्यांचं मतदान शिल्लक आहे. १ जून रोजी एग्झिट पोल आणि ४ जून रोजी संध्याकाळी अंतिम निकाल हाती येईल. या निकालांबाबत वेगवेगळी भाकितं वर्तवली जात असली, तरी शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं विधान केलं आहे.
आत्तापर्यंत झालेल्या पाच टप्प्यांमध्ये जवळपास ४३० मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं आहे. उरलेल्या जागांवर दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. यावेळी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूला झुकेल? याविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत. एनडीएकडून यंदा ४०० पार जागा जिंकण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातल्या ३७० जागा या भारतीय जनता पक्ष एकट्याने जिंकून आणेल, असा दृढ विश्वास पक्षाच्या नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. खुद्द मोदींनीही तसा दावा अनेक प्रचारसभांमधून केला आहे. या पार्श्वभूमीवर ४ जूनला देशाच्या निवडणूक निकालांचं नेमकं कसं चित्र समोर येणार आहे? याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत सोडलं टीकास्र
ज्येष्ठ पत्रकार प्रणोय रॉय यांनी आपल्या ‘डीकोडर’ या यूट्यूब चॅनलवरील ‘काऊंटडाऊन महाराष्ट्र २०२४’ या कार्यक्रमासाठी शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण नसल्याचं नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण? स्वत:च उत्तर देत म्हणाले, “माझा उत्तराधिकारी…”
“महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. एकतर इथलं गुंतवणुकीसंदर्भातलं सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण करावं लागेल. जर कुणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पूर्वी त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रासाठी होती. पण आता ते घडताना दिसत नाहीये. हे राज्यातल्या नेतृत्वामुळे घडत आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
मोदींच्या पंतप्रधानपदाचं काय?
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाबाबतही शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं. “मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखतो, त्यानुसार जर ते जे काही दावे करतायत त्यावर त्यांचा खरंच विश्वास असेल, जर त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावरतरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर मला वाटतं ते स्वत:च त्यातून बाहेर पडतील”, असं शरद पवार म्हणाले.