मुंबई : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, १३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी १०.४१ अब्ज डॉलरने वाढून ५७२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यानंतर परकीय गंगाजळी पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढे आले.

विद्यमान महिन्यात ६ जानेवारीला संपलेल्या आठवड्याच्या कालावधीत ती १.२६ अब्ज डॉलरने आटत ५६१.५८ अब्ज डॉलर नोंदण्यात आली होती. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये ५२४.५२ ही दोन वर्षांतील निचांकी पातळी गाठली होती. सरलेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयानेदेखील दोन महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी केली, त्याचे सकारात्मक परिणाम परकीय गंगाजळीवर दिसून आले.

ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर भांडवली बाजारात झालेली घसरण, रशिया-युक्रेन युद्ध, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन यामुळे त्यात घसरण कायम आहे. विशेषत: रिझर्व्ह बँकेकडून गेल्या वर्षी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मूल्य घसरण रोखण्यासाठी डॉलरची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आल्याने परकीय चलन गंगाजळीत मोठी घसरण झाली होती. गेल्या वर्षी रुपया ८३ या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गडगडल्याने त्याला सावरण्यासाठी हस्तक्षेप करताना, रिझर्व्ह बँकेकडून गंगाजळीतील डॉलर खुले केले गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुपया सावरला

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात १८ पैशांनी सावरून ८१.१८ पातळीवर बंद झाला. देशांतर्गत भांडवली बाजारातील वाढ आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या किंचित घसरणीमुळे रुपयाच्या मूल्यवर्धनाला फायदा झाला. परदेशी चलन विनिमय मंचावर रुपयाने ८१.२४ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८१.०९ ही उच्चांकी, तर ८१.२८ या निचांकी पातळीला स्पर्श केले. गुरुवारच्या सत्रात रुपया ८१.३६ पातळीवर स्थिरावला होता.