पीटीआय, नवी दिल्ली
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर वाढीव आयात शुल्क लादण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली असली, तरीही देशातील तेल कंपन्यांनी चालू ऑगस्ट महिन्यात २० लाख पिंप खनिज तेलाची खरेदी रशियाकडून केल्याचे स्पष्ट होत आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल ग्राहक आणि आयातदार असलेल्या भारताकडून युक्रेन युद्धापूर्वी ०.२ टक्क्यांपेक्षा कमी आयात होत असलेल्या रशियन तेलाचा आता देशाच्या एकूण तेल आयातीत वाटा ३५-४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, आधीच्या जुलै महिन्यांत रशियाकडून प्रति दिन १६ लाख पिंप खनिज तेलाची आयात करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात ते प्रमाण वाढून २० लाख पिंपावर पोहोचले आहे.
विश्लेषण प्रदात्या ‘केप्लर’च्या मते, ऑगस्ट महिन्यात अंदाजे प्रति दिन ५२ लाख पिंप खनिज तेलाची आयात भारताकडून करण्यात आली, त्यापैकी ३८ टक्के तेल हे रशियाकडून मिळविले गेले आहे. भारताने इराक आणि सौदी अरेबिया यांच्याकडून गेल्या महिन्यात प्रति दिन ७ लाख पिंप तेलाची आयात केली होती. केप्लरच्या मते, अमेरिका हा भारताचा पाचव्या क्रमांकाचा मोठा तेल पुरवठादार होता.
ट्रम्प प्रशासनाच्या घोषणेनंतरही, ऑगस्टमध्ये भारतात रशियन खनिज तेलाची आयात यथास्थित सुरू राहिली आहे, असे केप्लरचे प्रमुख संशोधन विश्लेषक सुमित रिटोलिया म्हणाले. ऑगस्टमध्ये प्राप्त झालेल्या तेलाची खरेदी ही जून आणि जुलैच्या सुरुवातीला नोंदवण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापि सरकारी मालकीच्या कंपन्यांना रशियन तेल खरेदी कमी करण्याचे केंद्र सरकारने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अरविंदर सिंग साहनी यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून तेल खरेदी कमी करा अथवा वाढवा याबाबत कोणतेही निर्देश देण्यात येत नाही. शिवाय कंपनीनेही जसे सुरू आहे त्यात काहीही बदल न करता, रशियन तेलाची खरेदी वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केलेले नाही. एप्रिल-जूनमध्ये इंडियन ऑइलने प्रक्रिया केलेल्या खनिज तेलात रशियन तेलाचा वाटा सुमारे २२ टक्के होता आणि नजीकच्या भविष्यातही तो तेवढाच राहण्याची अपेक्षा आहे, असे साहनी म्हणाले.
‘खरेदी धोरणांत बदल नाही’
गेल्या महिन्यात रशियामधून होणारी आयात ही जून तिमाहीतील एकूण आयातीच्या ३४ टक्क्यांच्या पातळीवरून कमी झाली आहे, कारण या तेल खरेदीवरील सवलत प्रति पिंप १.५ डॉलरपर्यंत घटली आहे. (भारतीय आयातदारांनी या आधी ही सवलत ४० डॉलरपर्यंत मिळविली आहे.) जोपर्यंत रशियन तेलावर नवीन निर्बंध येत नाहीत तोपर्यंत, खरेदीचे धोरण न बदलता ते उर्वरित वर्षासाठी एकूण आयातीच्या ३० ते ३५ टक्के असेल, असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (बीपीसीएल) संचालक वेत्सा रामकृष्ण गुप्ता यांनी सांगितले.