पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या परदेशी वित्तीय मालमत्तेत आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. यामागे प्रामुख्याने परदेशात वाढलेली प्रत्यक्ष गुंतवणूक, चलन व ठेवी आणि राखीव गंगाजळी यातील वाढ कारणीभूत असल्याच्या रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या परदेशी वित्तीय मालमत्तेत ७२ टक्के वाढ ही परदेशातील प्रत्यक्ष गुंतवणूक, चलन व आणि ठेवी यातील वाढीमुळे आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या एकूण बाह्य वित्तीय मालमत्तेत १०५.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली. याचवेळी बाह्य वित्तीय दायित्वही ७४.२ अब्ज डॉलरने वाढले आहे. यामुळे अनिवासी भारतीयांच्या निव्वळ दाव्यांमध्ये घट होऊन ते ३१.२ अब्ज डॉलरवर आले आहेत. जानेवारी ते मार्च तिमाहीत भारतीय नागरिकांच्या परदेशातील वित्तीय मालमत्तेत झालेली वाढ आणि परदेशी मालकीच्या भारतातील मालमत्तांमध्ये झालेली वाढीपेक्षा जास्त असल्याने निव्वळ वित्तीय दाव्यांमध्ये घट झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
भारताच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय मालमतांचे आंतरराष्ट्रीय वित्तीय दायित्वाशी असलेले गुणोत्तर मार्चमध्ये ७७.५ टक्क्यांवर आले. गेल्या वर्षी याच महिन्यात ते ७४.१ टक्के होते. या गुणोत्तरात झालेली सुधारणा ही देशाची बाह्य वित्तीय स्थिती भक्कम झाल्याचे निदर्शक आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीत देशाचे कर्ज १० अब्ज डॉलरने वाढले असून, देशातील प्रत्यक्ष गुंतवणुकीत ९.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.