पीटीआय, नवी दिल्ली : देशातील काही भागात निर्माण झालेला स्पर्धात्मक दबाव आणि लांबलेला पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे उत्पादनातील मंदावलेल्या वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये सेवा क्षेत्र वाढीचा दर पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर रोडावला, असे गुरुवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ५८.९ गुणांवर नोंदला गेला. सप्टेंबरमध्ये हा गुणांक ६०.९ गुणांवर होता. निर्देशांकाची ही मे महिन्यानंतरची नीचांकी पातळी आहे. सेवा क्षेत्राचा निर्देशांक ५० गुणांवर नोंदला गेल्यास विस्तार तर ५० गुणांखाली नोंदला गेल्यास आकुंचन झाल्याचे मानले जाते.
मागणीतील वाढ आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुसूत्रीकरणासारख्या घटकांमुळे एकंदर व्यावसायिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु स्पर्धा आणि अतिवृष्टीमुळे वाढीवर परिणाम झाला, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
सध्या परदेशातील विक्रीत वाढ झाल्याने भारतीय सेवांसाठी आंतरराष्ट्रीय मागणीत आणखी सुधारणा दिसून आली. सर्वेक्षणानुसार, विस्ताराचा दर स्थिर राहिला आहे, मात्र तो मार्चनंतरचा सर्वात कमकुवत पातळीवर नोंदवला गेला. जीएसटीतील सुधारणांमुळे किमतीवरील दबाव कमी झाला.
उत्पादन खर्च आणि विक्री किंमत अनुक्रमे १४ आणि सात महिन्यांतील सर्वात कमी दराने वाढल्या आहेत. कंपन्यांना पुढील १२ महिन्यांत वाणिज्य घडामोडींमध्ये वाढ होण्याचा दृढ विश्वास असून, नवीन व्यवसायांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी आणि विश्वासार्ह सेवा कायम राखण्यासाठी कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त कर्मचारी भरती केल्याचे दिसून आले.
दरम्यान, देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक सप्टेंबरमधील ६१ गुणांवरून, ऑक्टोबर महिन्यात ६०.४ गुणांपर्यंत घसरला आहे, एचएसबीसी इंडिया कंपोझिट पीएमआय आउटपुट निर्देशांकाने देखील मे महिन्यानंतरची सर्वात सौम्य वाढ दर्शविली.
