सरलेल्या जून महिन्यात देशाची व्यापार तूट अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून, निर्यात सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली असली तरी आयात देखील कमी झाल्यामुळे तूट नियंत्रणात राहिल्याचा दिलासा मिळू शकला.

सरलेल्या जूनमध्ये वस्तू व्यापार तूट १८.७८ अब्ज डॉलरवर सीमित राहिली, जी अर्थतज्ज्ञांची व्यक्त केलेल्या २२.२४ अब्ज डॉलरच्या अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. त्या आधीच्या म्हणजे मे महिन्यात वस्तू व्यापार तूट २१.८८ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती.

जूनमध्ये वस्तू निर्यात ३५.१४ अब्ज डॉलरवर होती, जी मागील महिन्यातील निर्यातीपेक्षा ९ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती अपरिवर्तित राहिली. याआधी नोव्हेंबरमध्ये निर्यात ३२.११ अब्ज डॉलरवर होती, त्यानंतरची ही निर्यातीची नीचांकी पातळी आहे. त्याच वेळी खनिज तेलाची आयात मे महिन्यातील १४.७ अब्ज डॉलरवरून कमी होऊन ती १३.७ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली.

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे, सोने आयात २.४ अब्ज डॉलरवरून १.८ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे. खनिज तेलाच्या किमती घसरल्याने जूनमध्ये व्यापार तूट आटोक्यात राहिली, असे व्यापार सचिव सुनील बर्थवाल यांनी मंगळवारी सांगितले.

मे महिन्यात आयात ६०.६१ अब्ज होती त्यात घसरण होऊन ती सरलेल्या जून महिन्यात ५३.९२ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली. तर गेल्यावर्षी म्हणजेच जून २०२४ मध्ये ती ५६ अब्ज डॉलरच्या पातळीवर होती. दरम्यान, जूनमध्ये भारताच्या सेवांमधील एकूण व्यापारात अंदाजे १५.६२ अब्ज डॉलरचा अधिशेष दिसून आला, ज्यामध्ये सेवा निर्यात ३२.८४ अब्ज डॉलर आणि आयात १७.५८ अब्ज डॉलर होती.

विद्यमान आर्थिक वर्षातील एप्रिल-जूनमध्ये, वस्तूंची निर्यात गेल्या वर्षीच्या ११०.०६ अब्ज डॉलरवरून वाढून ११२.१७ डॉलरवर पोहोचली आहे. तर आयात १७९.४४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जी गेल्यावर्षी याच महिन्यात १७२.१६ अब्ज डॉलर होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेला निर्यातीत वाढ

अमेरिकेने निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लादला असला तरी, त्या देशाला भारताची निर्यात वाढली आहे. सरलेल्या एप्रिल-जूनमध्ये, भारताची अमेरिकेला होणारी निर्यात २५.५२ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत २०.८९ अब्ज डॉलरवर मर्यादित होती.