नवी दिल्लीः अन्नधान्य आणि उत्पादित वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर अवघा ०.१३ टक्के नोंदविण्यात आला, असे मंगळवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. या आधीच्या महिन्यांत म्हणजेच ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दर ०.५२ टक्के नोंदवला गेला होता, त्या तुलनेत चौथा हिस्सा ठरेल, इतकी त्यात यंदाच्या सप्टेंबरमध्ये घसरण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत तो १.९१ टक्के पातळीवर होता.

प्रामुख्याने अन्न उत्पादने, इतर उत्पादन, अन्नेतर वस्तू, वाहतूक उपकरणे आणि कापड इत्यादींच्या किमती नरमल्यामुळे सरलेल्या सप्टेंबरमध्ये महागाईचा दिलासादायी दर दिसून आला, असे उद्योग मंत्रालयाने या संबंधाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या काही महिन्यापासून खाद्यान्नांमधील चलनघटीची (डिफ्लेशन) स्थिती सप्टेंबरमध्येही कायम राहिली.

खाद्य वस्तूंमधील चलनघट या महिन्यांत ५.२२ टक्क्यांवर पोहोचली, जी ऑगस्टमध्ये ३.०६ टक्के पातळीवर होती. भाज्यांच्या किमती लक्षणीय कमी झाल्याचा हा परिणाम आहे. सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या किमतीतील घसरण ही वार्षिक तुलनेत २४.४१ टक्के होती, जी ऑगस्टमध्ये देखील १४.१८ टक्के घसरण दिसली होती.

उत्पादित वस्तूंच्या बाबतीत, महागाई ऑगस्टमध्ये २.५५ टक्के होती, जी सप्टेंबरमध्ये २.३३ टक्के झाली आहे. इंधन आणि वीज या दोन्ही घटकांच्या किमतींनी सप्टेंबरमध्ये नकारात्मक वळण घेतले आणि त्यात २.५८ टक्के चलनघट किंवा घसरण दिसून आली.

दीर्घावधीची नरमाई शक्य

जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती कमी होत असताना, भारतातही घाऊक किंमत निर्देशांकातील महागाईतील नरमाई ही अधिक काळासाठी सुरू राहण्याची अपेक्षा आहे, असे बार्कलेज इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आस्था गुडवाणी म्हणाल्या. खरिपाचे पीक आणि पुढील तिमाहीत रब्बी उत्पादनांची अपेक्षित आवक यामुळे अन्नधान्य महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यतः भाज्या व अन्नधान्याच्या किमती नरमल्याने सप्टेंबरचा किरकोळ महागाई दर १०० महिन्यांच्या नीचांकी १.५४ टक्क्यांवर ओसरल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.