नवी दिल्ली: जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत २०२५ मध्ये उत्साहदायी अपेक्षा नाहीत आणि गती काहीशी कमी होण्याची चिन्हे असली, तरी भारतीय अर्थव्यवस्थेकडून मात्र मजबूत वाढ राखली जाण्याची शक्यता आहे, असे मत जगभरातील बहुतांश मुख्य अर्थतज्ज्ञांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदविले आहे.

जागतिक आर्थिक मंचाने (डब्ल्यूईएफ) प्रसिद्ध केलेल्या मुख्य अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन मांडणाऱ्या ताज्या अहवालाचे हे भाकीत आहे. या निमित्ताने झालेल्या सर्वेक्षणांत सहभागी ५६ टक्के मुख्य अर्थतज्ज्ञांच्या मते, २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल आणि परिस्थिती पुढे आणखी कमकुवत होण्याची त्यांची अपेक्षा आहे. केवळ १७ टक्के अर्थतज्ज्ञांनी नजीकच्या भविष्यात सुधारणा अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >>> इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत २०२५ मध्ये मजबूत वाढीची अपेक्षा आहे. बरोबरीने दक्षिण आशिया, विशेषतः भारताकडूनदेखील मजबूत वाढ राखली जाण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षणांत सहभागी ७४ टक्क्यांनी युरोपबाबत दृष्टिकोन निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.
जगभरातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या मुख्य अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत आणि सर्वेक्षणांच्या आधारे ‘डब्ल्यूईएफ’ने तयार केलेल्या अहवालाचा चीनबाबतचा अंदाजही कमकुवत आहे आणि येणाऱ्या काळात तेथे विकासदर हळूहळू मंदावण्याची शक्यता त्याने वर्तविली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारकडून धोरणात्मक प्रतिसाद अपेक्षित

दक्षिण आशिया क्षेत्राकडून दिसून येणारी आर्थिक चमक अहवालाने विशेषकरून अधोरेखित केली आहे. ही प्रादेशिक कामगिरी मुख्यत्वे भारतातील मजबूत वाढीमुळे शक्य होणार आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान अबाधित राहणार असले तरी अर्थव्यवस्थेच्या गतीला येथेही अवरोधाची चिन्हे आहेत, असे त्यात म्हटले आहे. ग्राहकांची मागणी कमी झाल्याने आणि पर्यायाने उत्पादकताही कमी झाल्याने चीनची आर्थिक गती मंदावण्याचा अंदाज आहे. तथापि याच गतिरोधक पैलूची भारताच्या अर्थव्यवस्थेवरही छाया आहे, याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे.
——————————————–