मुंबई : जागतिक डिजिटल सहकार्य आणि भागीदारी वाढविताना, भारत आपले तंत्रज्ञान हे इतर देशांना उपलब्ध करण्यासह, तंत्रज्ञान विकसित करण्यातही त्यांना मदत करत आहे. भारताकडून सुरू असलेले हे डिजिटल बलशालीकरण आहे, जे विकसनशील देशांसाठी आशेचा किरण आहे. देशाच्या ‘फिनटेक’ सामर्थ्याला जागतिक मान्यताही मिळत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
पुढील सहा महिन्यांत जगातील अव्वल तिसरे आणि गुंतवणूकदारांद्वारे सर्वाधिक निधी-सहाय्य मिळविलेले फिनटेक-विश्व भारतात साकारलेले दिसून येईल, असा ठाम विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. सहाव्या जागतिक फिनटेक परिषदेच्या (जीएफएफ) व्यासपीठावरून त्यांनी देशातील फिनटेक आणि नवउद्यमी उपक्रमांच्या संस्थापकांना संबोधित केले. यासमयी व्यासपीठावर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, जीएफएफ सल्लागार मंडळाचे प्रमुख क्रिस गोपालकृष्णन उपस्थित होते.
तंत्रज्ञान ही केवळ सुविधा नव्हे तर समानतेचे साधन बनू शकते, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. जनधन-आधार-मोबाईल या त्रिसूत्रीने देशाच्या बँकिंग व्यवस्थेतही बदल घडवून, तिला अधिक सर्वसमावेशक बनविले. जगातील प्रत्येक १०० पैकी निम्मे म्हणजे ५० डिजिटल आर्थिक व्यवहार हे भारतात सुरू आहेत. ‘यूपीआय’ ही आता जनसामान्यांसाठी दैनंदिन जीवनाचा भाग बनली असून, महिन्याला तब्बल २५ लाख कोटी रुपयांचे २० अब्ज उलाढाली त्या माध्यमातून पार पडत आहेत. डिजिटल आर्थिक व्यवहाराचे हे सर्वसमावेशक रूप आणि लोकशाही मूलतत्वाला जागतिक फिनटेक परिषद देखील चालना देत असून, पंतप्रधानांनी आयोजकांचे कौतुकही या निमित्ताने केले.
मी ब्रिटनसह सर्व देशांना भारतासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करतो. भारताच्या विकासगाथेत सहभागी होण्यासाठी सर्व जागतिक गुंतवणूकदारांचे स्वागत आहे. आपल्याला असे फिनटेक जग निर्माण करायचे आहे जेथे तंत्रज्ञान, लोक आणि आपली वसुंधरा सर्वांची भरभराट होऊ शकेल. नवोपक्रमाचे ध्येय केवळ वाढ नसून जनकल्याण देखील असावे आणि वित्त म्हणजे केवळ आकडे न ठरता मानवी प्रगतीचे साधन बनावे, असे मोदी म्हणाले.
भारत लोकशाहीची जननी आहे हे अधोरेखित करून मोदी म्हणाले, जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ निवडणुका आणि धोरणनिर्मितीपुरते मर्यादित नाही. भारताने लोकशाही भावनेला प्रशासनाचा एक मजबूत आधारस्तंभ बनविले आहे. तंत्रज्ञानाने या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘भारत-ब्रिटन भागीदारीची ही केवळ सुरुवात’
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या मुक्त व्यापार कराराचा उल्लेख करताना, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी उभय देशांत होऊ घातलेल्या गुंतवणूक आणि भागीदारीची ही केवळ सुरुवात आहे, असे प्रतिपादन केले. गुंतवणुकीसाठी ब्रिटन हा क्रमांक एकचा पर्याय ठरावा, असे नमूद करून त्यांनी भारतीय व्यवसायांना आमंत्रित करणारी साद घातली. जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार म्हणून ब्रिटनकडे पाहावे, असे ते म्हणाले. ही नव्या युगाची सुरुवात आहे, ज्यायोगे उभय देशातील प्रत्येक व्यावसायिक आणि कामकरी जनतेचे जीवनमान सुंदर बनविले जाईल.