नवी दिल्ली : देशातील सेवा क्षेत्राची वाढ ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी पातळीवरून, सरलेल्या सप्टेंबरमध्ये काहीशी घसरली आहे. गेल्या महिन्यात नवीन व्यवसाय आणि क्रियाकलापातील वाढीचा वेग कमी झाल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आले. एचएसबीसी इंडियाच्या सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांच्या सर्वेक्षणावर आधारित पीएमआय निर्देशांक ऑगस्ट महिन्यात नोंदविलेल्या ६२.९ गुणांसह १५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर होता. मात्र सप्टेंबरमध्ये त्यात घसरण होऊन तो ६०.९ गुणांवर नोंदवला गेला आहे. या महिन्यात सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला असला त्यातील विस्तारपूरकता कायम आहे. पीएमआयच्या परिभाषेत, ५० पेक्षा जास्त गुण हे विस्तारदर्शक, तर ५० पेक्षा कमी गुण म्हणजे आकुंचन दर्शवितात.

सेवा क्षेत्राची गती ऑगस्टमध्ये उच्चांकी पातळीवर होती. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात हा वेग मंदावला आहे. सर्वच पातळ्यांवर वाढीचा वेग कमी दिसून आलेला असला तरी या क्षेत्राच्या व्यवसायाच्या कामगिरीवर याचा तूर्त फार मोठा परिणाम दिसलेला नाही, असे मत एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवर बोलताना व्यक्त केले.

भारतीय सेवा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय कार्यादेशातील वाढ गेल्या महिन्यात कमी झाली आहे. बाह्य विक्रीत वाढ झाली असली तरी तीही मार्चनंतरच्या किमान पातळीवरच आहे. कंपन्यांकडून स्वस्तातील सेवा पुरवठादारांचे पर्याय शोधले जात आहेत, हे निर्यातीच्या कार्यादेशातील वाढ मंदावण्यामागील प्रमुख कारण ठरले आहे. किमतीचा विचार करता महागाईचा ताण कमी झाल्याचे दिसून आले आहे. किमतीतील वाढीचा दर हा मार्चनंतरचा सर्वांत कमी असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक ऑगस्ट महिन्यात नोंदविल्या गेलेल्या ६३.२ गुणांवरून, सप्टेंबरमध्ये ६१ गुणांवर सीमित राहिला आहे. हा चालू वर्षातील जून महिन्यानंतरचा सर्वांत कमी नोंदवला गेलेला विस्तार दर आहे. देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रांच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे हा संयुक्त पीएमआय निर्देशांक तयार केला जातो.

रोजगार निर्मितीतही घट

रोजगार निर्मितीतही सरलेल्या सप्टेंबर महिन्यात घट झालेली आहे. सेवा क्षेत्रातील पाच टक्क्यांपेक्षाही कमी कंपन्यांनी रोजगार निर्मितीत वाढ नोंदविली आहे. असे असले तरी आगामी काळातील व्यवसाय वृद्धीबद्दल कंपन्या सकारात्मक आहेत. ही सकारात्मक भावना सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.