पीटीआय, नवी दिल्ली

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने सरलेल्या डिसेंबर २०२२ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाई दराचा पारा आणखी उतरला. आधीच्या नोव्हेंबर महिन्याच्या ५.८८ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या महिन्यांत ५.७२ टक्क्यांवर उतरल्याने या आघाडीवर येत्या काळात सर्वसामान्यांसह, धोरणकर्त्यांनाही दिलासा अनुभवता येण्याचे संकेत मिळत आहेत.

केंद्राच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही महिन्यांत दिसून आलेल्या चढत्या क्रमापासून फारकत घेत किरकोळ महागाई दर डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या वरच्या सहनशील पातळीपेक्षा खाली येत ५.७२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ही किरकोळ महागाई दराची वर्षभरातील नीचांकी पातळी आहे. या आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.८८ टक्के नोंदविण्यात आला होता. त्याआधीच्या वर्षात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये तो ५.६६ टक्के राहिला होता. सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाली आहे.

केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेसाठी गेल्या वर्षभरापासून महागाई दराचा हा उच्च स्तर डोकेदुखी बनला होता. दोहोंकडून वाढत्या महागाईला लगाम लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण २२५ आधार बिंदूंची दरवाढ केली आहे आणि बँकांकडून कर्ज घेणे महाग केले आहे. आता अन्नधान्य मुख्यत: भाज्या व डाळी आणि अन्य चीज वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे देशातील किरकोळ महागाईच्या दरात सरलेल्या जुलै महिन्यात घट दिसून आली. सरलेल्या महिन्यात अन्नधान्य महागाई दरात घसरण झाली असून नोव्हेंबरमधील ४.६७ टक्क्यांवरून कमी होत ४.१९ टक्क्यांवर आला आहे. कमी झालेल्या महागाई दराचे सुपरिणाम पुढील महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात दिसण्याची आशा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरमाईचे कारण काय?

महागाई दरातील या नरमाईसाठी प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीत झालेली घट कारणीभूत ठरल्याचे ‘एनएसओ’ची आकडेवारीनुसार, मासिक आधारावर अंडी, मांस, मासे, फळे, साखर स्वस्त झाली. मात्र त्यातुलनेत तृणधान्याच्या किमतीत मासिक आधारावर १.१ टक्क्यांची वाढ झाली आहे. अन्नधान्याच्याव्यतिरिक्त, गृहनिर्माण क्षेत्राने सुखद धक्का दिला आहे, ज्याचा निर्देशांक महिना-दर-महिना आधारावर ०.६ टक्क्यांनी घसरला. सहा महिन्यांच्या कालावधीत प्रथमच गृह निर्माण क्षेत्रातील महागाई निर्देशांकात घसरण झाली आहे.