नवी दिल्ली : देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाने १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) योजनेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती इन्फोसिसने बुधवारी बाजार मंचांना दिली.
गेल्या महिन्यात ११ सप्टेंबरला इन्फोसिसच्या संचालक मंडळाने १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. समभाग पुनर्खरेदीसाठी १,८०० रुपये प्रतिसमभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे. वर्ष २०२२ नंतर इन्फोसिसकडून जाहीर केलेली ही पहिली पुनर्खरेदी योजना आहे, त्यावेळी कंपनीने ९,३०० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले होते. गेल्या दशकभरात कंपनीने केलेली ही सर्वात मोठी आणि पाचवी समभागपुनर्खरेदी आहे.
३० सप्टेंबर २०२५ अखेर, कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे १४.३० टक्के हिस्सेदारी आहे, तर ८५.४६ टक्के समभाग जनतेकडे आहेत. प्रवर्तकांमध्ये, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्याकडे कंपनीचे १.०८ टक्के हिस्सेदारी आहे. त्यापाठोपाठ नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्याकडे अनुक्रमे ०.४० टक्के आणि ०.९१ टक्के हिस्सा आहे, तर त्यांची मुले रोहन मूर्ती आणि अक्षता मूर्ती यांच्याकडे कंपनीची अनुक्रमे १.६० टक्के आणि १.०३ टक्के हिस्सेदारी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांच्याकडे कंपनीत ०.८४ टक्के, तर त्यांच्या पत्नी सुधा गोपालकृष्णन यांच्याकडे २.५२ टक्के हिस्सा होता. विशेष म्हणजे, सर्व प्रवर्तकांमध्ये सुधा गोपालकृष्णन यांच्याकडे सर्वाधिक हिस्सेदारी आहे.
प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाने कंपनीच्या १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समभागाने ५ टक्क्यांची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा समभाग ३.७१ टक्क्यांनी वधारून १,५२६.७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ६.३४ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
प्रवर्तकांचा निर्णय भागधारकांसाठी फायदेशीर
समभाग पुनर्खरेदीमध्ये सहभागी न होण्याचा प्रवर्तकांचा निर्णय कंपनीच्या भविष्यातील संभाव्यतेवरील विश्वास दर्शवितो. तसेच प्रवर्तक सहभागी होणार नसल्याने किरकोळ भागधारकांकडील अधिकाधिक समभाग खरेदी केले जाण्याची आशा बळावली आहे.
