पीटीआय, नवी दिल्ली

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट्स) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट्स) या दोन्ही मालमत्ता वर्गांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ९ लाख कोटी रुपयांपुढे पोहोचली आहे. दोन्ही गुंतवणूक पर्याय लोकप्रिय होत असून गेल्या नऊ वर्षांत हा टप्पा गाठला आहे.

रिट्सची संघटना असलेल्या आयआरए आणि इन्व्हिट्सची संघटना असलेल्या बीआयएच्या अंदाजानुसार, वर्ष २०३० पर्यंत रिट्स आणि इन्व्हिट्स या दोन्ही मालमत्ता वर्गातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्या, भारतात पाच सूचिबद्ध रिट्स आहेत. यामध्ये ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बेसी ऑफिस पार्क्स रिट्स, माइंडस्पेस बिझनेस पार्क्स रिट्स, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आणि नॉलेज रिॲलिटी ट्रस्ट आहेत. तर एकूण २७ सेबी-नोंदणीकृत इन्व्हिट्स आहेत आणि त्यापैकी पाच भांडवली बाजारामध्ये सूचिबद्ध आहेत. पहिले इन्व्हिट्स २०१६ मध्ये तर पहिले रिट्स २०१९ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले होते. रिट्स आणि इन्व्हिट्सच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सध्या अनुक्रमे २.२५ लाख आणि ७ लाख कोटी रुपये आहे.

रिट्स आता भांडवली बाजारात एक मुख्य प्रवाहातील उत्पादन म्हणून दृढपणे स्थापित झाले आहेत, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असा गुंतवणूक पर्याय म्हणून पुढे आला आहे, असे आयआरएचे अध्यक्ष आलोक अग्रवाल यांनी सांगितले. रिट्सच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २०३० अखेरपर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची आशा आहे.

रिट्स/ इन्व्हिट्स म्हणजे काय?

रिट्स आणि इन्व्हिट्स या मालमत्ता वर्गांची १९६०च्या दशकात अमेरिकेमध्ये सुरुवात झाली आणि ही गुंतवणूक साधने भारतात सुरू करण्यास २०१४ मध्ये बाजार नियामक ‘सेबी’ने मान्यता दिली. तुलनेने नव्या असलेल्या गुंतवणूक साधनांच्या भारतीय गुंतवणूक परिसंस्थेतील परिणामकारकता आणि फायद्यांबाबत सुरुवातीला बरीच अनिश्चितता होती. मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) या संदर्भात नवीन निर्देशांक प्रस्तुत करून त्यात वाढत्या गुंतवणुकीलाच अधोरेखित केले. जागतिक स्तरावर, पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी गुंतवणूकदारांकडून वापरात येणारे हे मार्ग आहेत. मात्र भारतात अद्याप सामान्य गुंतवणूकदारांमध्ये हे पर्याय फारसे लोकप्रिय नाहीत.