लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात सावध पवित्रा अवलंबिला. परिणामी, शेअर बाजारात संथ व्यवहार सुरू होते आणि प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि टेक महिंद्रच्या समभागांमध्ये घसरण झाली. मात्र दुसरीकडे बँकिंग आणि औषधनिर्माण कंपन्यांचे समभाग वधारल्याने निर्देशांकांतील घसरण मर्यादित राहिली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४.०९ अंशांनी घसरून ७२,१५२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७२,५५९.२१ अंशांची उच्चांकी आणि ७१,९३८.२२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये नगण्य वाढ झाली आणि तो २१,९३०.५० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>देशावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पावले; अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेला ग्वाही

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीपूर्वी मजबूत पीएमआय डेटा आणि अनुकूल जागतिक संकेत असूनही, देशांतर्गत बाजारपेठेने सावध पवित्रा घेतला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर भूमिकेत कोणताही बदल अपेक्षित नसला तरी संभाव्य दर कपात आणि तरलतेतील सुधारणेसाठी रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या संकेतांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँक, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक आणि एशियन पेंट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर टेक महिंद्र, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, विप्रो, लार्सन अँड टुब्रो आणि एनटीपीसीच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स ७२,१५२ -३४.०९ (०.०५ टक्के )

निफ्टी २१,९३०.५० १.१ (०.०१ टक्के)

डॉलर ८२.९६ -९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेल ७९.११ ०.६६