वृत्तसंस्था, बेंगळुरू : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस लिमिटेड समभाग पुर्नखरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या ११ सप्टेंबरच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे. यापूर्वी इन्फोसिसचा वर्ष २०२२ मध्ये समभाग पुर्नखरेदी योजना राबवली होती. त्यावेळी कंपनीने ९,३०० कोटी रुपयांचे समभाग पुर्नखरेदी केले होते, यासाठी प्रति समभाग १,८५० रुपये किंमत निश्चित केली होती.
समभाग पुर्नखरेदी हा भागधारकांना भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. ज्यावेळी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या पुस्तकांवरील रोख रक्कम वाढते, त्यावेळी त्यांच्याकडून समभाग पुर्नखरेदीची योजना हाती घेऊन गुंतवणूकदारांना भरभरून फायदा देत असतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टीसीएससारख्या कंपन्यांनी देखील अनेकदा समभाग पुर्नखरेदीची राबवून गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल इन्फोसिसने सरलेल्या जून तिमाहीत ६,९२१ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. त्यात ८.७ टक्के वाढ नोंदवली. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीने ६,३६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.
समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?
एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.कंपन्या ‘बायबॅक’ का करतात?कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध कार्यांसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्याव्यतिरिक्तदेखील ठरावीक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.