लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जेएसडब्लू समूहातील पायाभूत सुविधा कंपनी असलेल्या जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागांनी मंगळवारी भांडवली बाजारात दमदार पर्दापण केले. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होऊन यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना या समभागाने सूचिबद्धतेलाच ३२ टक्के अधिक परतावा दाखविला आहे.

मंगळवारी जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागाने मुंबई शेअर बाजारात १४३ रुपयाच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. प्रति समभाग ११९ रुपये किमतीला प्रारंभिक भागविक्रीतून हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला असून, त्याने बाजारात पहिले पाऊलच २०.१६ टक्के अधिमूल्यासह टाकले. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने १५७.३० रुपयांचा किमतीतील उच्चांकही गाठला. दिवसअखेर तो प्रति समभाग ३८.३० रुपयांच्या लाभासह १५७.३० रुपये या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर स्थिरावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने आयपीओच्या माधमातून २,८०० कोटी रुपयांचा निधी उभारला असून त्यासाठी ११३-११९ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर,ही बंदर-संबंधित पायाभूत सुविधा कंपनी असून ग्राहकांना माल हाताळणी, साठवणूक, दळणवळण सेवा आणि इतर मूल्यवर्धित सेवांसह सागरी-मार्गाशी सेवा प्रदान करते.