मुंबई : इटलीतील ‘प्राडा’ या कंपनीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली. या भेटीदरम्यान विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेतली जाणार आहे.
‘प्राडा’ची चप्पल राज्यातील प्रतिष्ठित हस्तनिर्मित कोल्हापुरी चपलेपासून प्रेरित असल्याचे मान्य करत मेक इन इंडिया- कोल्हापूर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याबाबत इटलीतील या फॅशन नाममुद्रेने उत्सुकता दर्शवली आहे. ‘प्राडा’ आणि भारतीय शिष्टमंडळ यांच्यात शुक्रवारी पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्र चेंबरने सांस्कृतिक आदान-प्रदान, नाममुद्रा विकास, न्याय व्यापार यावर आधारित मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात ‘प्राडा’ने महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा हेतू स्पष्ट केला. कोल्हापुरी वहाणच नव्हे, तर पैठणी, चांदीचे पायल आणि इतर स्थानिक हस्तकला प्रकल्पांवरही सहकार्याचा मानस त्यांनी व्यक्त केल्याचे महाराष्ट्र चेंबरचे गांधी यांनी पत्रकारांना सांगितले. सध्या कोल्हापूरमध्ये १ लाख कारागीर हे कोल्हापुरी चपलेशीसंबधित व्यवसायात गुंतले असून, त्यांची वार्षिक १,४०० ते १,५०० कोटी रुपयांची बाजारपेठ आहे.
इटली येथील प्राडा या कंपनीच्या उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चपलेचा वापर केला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर या कंपनीने भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली होती. प्राडाचे संचालक लोरेंझो बर्टेली यांनी याबाबत एक पत्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना पाठवले होते.दरम्यान, भारतातून दबाव वाढल्यानंतर आता ‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चपलेच्या ‘फॅशन शो’मधील वापराबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.