लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) एसबीआय कार्डशी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी गुरुवारी सामंजस्य करार केला. या भागीदारीतून ग्राहकांच्या आर्थिक आणि आधुनिक जीवनशैलीच्या गरजा लक्षात घेऊन खास सुविधायुक्त संयुक्त क्रेडिट कार्ड सादर करण्यात येणार आहे.
याबाबत महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी निधू सक्सेना म्हणाले, की, एसबीआय कार्डशी भागीदारी ही आमच्या किरकोळ सेवा क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर, आधुनिक आणि फायदेशीर सेवा देता येतील. विश्वासार्ह भागीदारांच्या सहकार्याने बँक नेहमीच ग्राहकहिताला प्राधान्य देत आली आहे.
या भागीदारीतून बँकेचा मोठा ग्राहक वर्ग आणि शाखांच्या विस्तृत जाळ्याचा फायदा, तसेच क्रेडिट कार्ड क्षेत्रातील एसबीआय कार्डचा अनुभव आणि डिजिटल सेवांचा मिलाप घडून येईल आणि ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्यात येईल. आकर्षक वैशिष्ट्ये असलेली को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बँकेचे ग्राहक वापरू शकतील. त्यात रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक ऑफर, इंधन अधिभार शुल्क माफी, मासिक हप्ता सुविधा आणि खानपान, प्रवास, ई-कॉमर्स खरेदीवर खास सवलती या वैशिष्टांचा समावेश आहे. बँकेकडून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड देशभरात ऑनलाइन अथवा शाखांमध्ये अर्ज करून ग्राहकांना मिळवता येतील, असे महाबँकेने म्हटले आहे.