पीटीआय, नवी दिल्ली

दिवंगत विक्रम किर्लोस्कर यांची कन्या मानसी टाटा यांनी वाहन निर्मितीतील टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या (टीकेएम) उपाध्यक्षपदाची सूत्रे गुरुवारी हाती घेतली. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे माजी उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर त्याच्या जागी ही नियुक्ती करण्याबाबतचा ठराव कंपनीने यापूर्वीच मंजूर केला होता.

गेल्या वर्षी २६ डिसेंबरला वडिलांच्या निधनानंतर टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या संचालक मंडळात मानसी रुजू झाल्या होत्या. तसेच त्या संचालक मंडळातील सक्रिय सदस्य राहिल्या असल्याचे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. टीकेएमच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नामांकित किर्लोस्कर उद्योगघराण्याच्या पाचव्या पिढीच्या प्रतिनिधी मानसी टाटा यांनी अमेरिकेतील ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझाइनमधून पदवी प्राप्त केली आहे. त्या ‘केअरिंग विथ कलर’ ही बहुउद्देशीय ना-नफा संस्था (एनजीओ) देखील चालवतात.