मुंबई : देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारात कंपन्यांचा तिमाही आर्थिक कामगिरीचा हंगाम सुरू होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि माहिती तंत्रज्ञान, वायू कंपन्यांमधील समभाग विक्रीच्या माऱ्याने बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक घसरले.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १७६.४३ अंशांनी घसरून ८३,५३६.०८ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३३०.२३ अंश गमावत ८३,३८२.२८ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४६.४० अंशांची घसरण झाली आणि तो २५,४७६.१० पातळीवर बंद झाला.

जागतिक व्यापार तणाव आणि अतिरिक्त करभारासंबंधित घोषणेबाबत चिंता कायम असलीतरी, गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत उत्पन्न आणि संरचनात्मक वाढीच्या चालकांकडे वाढते आहे. यामध्ये शहरी मागणीत होणारी अनुक्रमिक पुनर्प्राप्ती आणि पायाभूत सुविधांवर आधारित खर्चात वाढ यांचा समावेश आहे, असे निरीक्षण असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात घसरण झाली. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांच्या समभागांची कामगिरी समाधानकारक राहिली.

सेन्सेक्स ८३,५३६.०८ -१७६.४३ (-०.२१%)

निफ्टी २५,४७६.१० -४६.४० (- ०.१८%)

तेल ७०.५१ ०.५१%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.६७ -६ पैसे