scorecardresearch

इक्विटी फंडात फेब्रुवारीमध्ये १५,६८५ कोटींचा ओघ

समभागसंलग्न म्युच्युअल फंडाच्या अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडात फेब्रुवारीमध्ये १५,६८५ कोटींचा एकूण ओघ आला

mutual funds
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जगभरात सुरू असलेल्या प्रवाहाप्रमाणे देशांतर्गत भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण असूनही समभागसंलग्न म्युच्युअल फंडाच्या अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडात फेब्रुवारीमध्ये १५,६८५ कोटींचा एकूण ओघ आला. ही गेल्या नऊ महिन्यातील उच्चांकी पातळी आहे. या आधी जानेवारी महिन्यात इक्विटी फंडामध्ये १२,५४६ कोटींची गुंतवणूक आली होती. तर त्याआधीच्या डिसेंबर २०२२ मध्ये ७,३०३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती.

इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सलग २४ व्या महिन्यात सकारात्मक प्रवाह राहिला. फेब्रुवारीमध्ये या फंडातील नक्त ९,५७५ कोटी रुपयांचा ओघ राहिला. मे २०२२ मध्ये इक्विटी फंडात १८,५२९ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती, त्या उच्चांकाला फेब्रुवारी २०२३ मध्ये अनुभवलेल्या १५,६८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने मोडीत काढले, अशी माहिती म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’ने शुक्रवारी दिली.

आणखी वाचा- डेलॉइटकडून तीन वर्षांत मनुष्यबळात ५० हजारांची वाढ

म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून ऑक्टोबर २०२२ पासून मासिक प्रवाह १३,००० कोटी रुपयांपुढे राहिला आहे. इक्विटी फंडातील थीमॅटिक किंवा सेक्टोरल फंडांमध्ये ३,८५६ कोटी रुपयांचा प्रवाह दिसून आला. तसेच स्मॉल-कॅप फंडात २,२४६ कोटी रुपये आणि मल्टी-कॅप फंडामध्ये १,९७७ कोटी रुपयांचा ओघ आल्याचे आढळून आले. इक्विटी फंडाव्यतिरिक्त, इंडेक्स फंड देखील गुंतवणुकीला आकर्षित करत असून, फेब्रुवारीत या फंड प्रकाराने एकूण ६,२४४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली. तसेच गुंतवणूकदारांनी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये (ईटीएफ) १६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात ३९.४६ लाख कोटींवर पोहोचली आहे. जी जानेवारी महिन्यात ३९.६२ लाख कोटी रुपये नोंदवण्यात आली होती.

आणखी वाचा- Gold-Silver Price on 12 March 2023: रंगपंचमी दिवशी सोन्याचे भाव कडाडले, चांदीही चमकली; वाचा आजचे दर

डेट फंडांना गळती

व्याजदर वाढीमुळे रोखेसंलग्न (डेट) म्युच्युअल फंडाला गळती लागली आहे. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात डेट फंडातून १३,८१५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. त्या आधीच्या महिन्यात (जानेवारी २०२३) १०,३१६ कोटी रुपयांचे निर्गमन झाले होते. यामध्ये लिक्विड फंडातून सर्वाधिक ११,३०४ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले. त्यानंतर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडातून २,४३० कोटी आणि शॉर्ट ड्युरेशन फंडातून १,९०४ कोटींचा निधी काढून घेण्यात आला.

सलग दोन महिने महागाईने दिलासा दिल्यानंतर, ती पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या सहनशील पातळीपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून आगामी पतधोरणात रेपो दरात वाढ शक्य आहे. याचबरोबर अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून देखील व्याजदरात वाढीची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसे झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांचा मायदेशी ओढा वाढण्याची शक्यता अधिक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 10:16 IST
ताज्या बातम्या