मुंबईः चीनने दुर्मिळ खनिज घटकांच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यानंतर टाटा मोटर्सने पर्यायी स्रोतांतून चुंबकांचा पुरवठा मिळविण्यासाठी सरकारच्या मदतीने शोध आणि प्रयत्न सुरू आहेत, असे कंपनीचे अध्यक्ष एन, चंद्रशेखरन यांनी शुक्रवारी भागधारकांंनी उपस्थित केलेल्या चिंतांच्या उत्तरादाखल शुक्रवारी स्पष्ट केले.
चीनने निर्यातीवर आणलेले निर्बंध आणि वाहन निर्मितीतील महत्त्वाचा घटक असलेल्या चुंबकांच्या कमतरतेतून होऊ शकणाऱ्या परिणामांबद्दल भागधारकांनी टाटा मोटर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केले. त्यांना उत्तर देताना चंद्रशेखरन म्हणाले, सध्या तरी ही चिंतेची बाब नाही, तथापि त्यावर आम्ही खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवले आहे. सध्या तरी आवश्यक असलेले चुंबक मिळविता येतात आणि माल साठा (इन्व्हेंटरी) योग्य पातळीवर राखण्याची आमची योजना आहे. या संबंधाने सरकारसोबत काम सुरू असून, पर्यायी स्रोतांकडून पुरवठा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दुर्मिळ खनिज चुंबकांच्या आयातीसाठी चीन सरकारकडून मंजुरी जलदगतीने मिळावी यासाठी सरकारची मदत मागितली होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
इराण-इस्रायल युद्धाचा कंपनीच्या व्यवसायावर काय परिणाम होईल या प्रश्नावर ते म्हणाले, युद्धाची यापुढे परिस्थिती कशी असेल याचे उत्तर देणे खूप कठीण आहे. टाटा मोटर्स समूहाच्या – वाणिज्य वाहने, प्रवासी वाहने आणि जेएलआर – अशा तिन्ही कंपन्यांचे व्यावसायिक व्यासपीठ खूप मजबूत स्थितीत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या कंपन्या उत्कृष्ट वाढीसाठी पूर्णपणे तयार आणि सज्ज आहेत. अल्पावधीत कोणत्याही भू-राजकीय मुद्द्यांवर मात करण्याची सक्षमता त्यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले.
चंद्रशेखर यांनी प्रास्तविकपर भाषणात, व्यापक भू-राजकीय संघर्ष, लष्करी संघर्ष, पुरवठा साखळी आणि शुल्क व्यवस्थेची पुनर्रचना, कृत्रिम प्रज्ञा- एआय तंत्रज्ञानाचा अवलंब आणि ऊर्जा संक्रमण या घटकांपासून येत्या काळात आर्थिक चक्रांमध्ये अस्थिरता कायम राहिल, असे सूचित केले. इतर सर्व क्षेत्रांपेक्षा वाहन उद्योग क्षेत्रात त्यापायी व्यत्यय आणि मोठ्या उलथापालथ घडून येण्याची शक्यता दिसत आहे.
विलगीकरण अंतिम तिमाहीत
टाटा मोटर्सच्या वाणिज्य वाहने (सीव्ही) आणि प्रवासी वाहनांच्या (पीव्ही) विभागांचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विलगीकरण चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत होईल, असे चंद्रशेखरन यांनी यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. प्रथम पीव्ही कंपनी सूचीबद्ध केली जाईल आणि नंतर सीव्ही कंपनी काही महिन्यांनंतर सूचीबद्ध केली जाईल. ‘आमच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ तिमाहीच्या आसपास हे घडून येईल,’ असे ते म्हणाले.