मुंबईः घोटाळेग्रस्त न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला विलीन करून घेण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला गेली असून, येत्या सोमवार ४ ऑगस्ट २०२५ पासून तिच्या सर्व शाखा या सारस्वत बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत होतील. गेले पाच महिने आपल्याच खात्यातील ठेवी वापरता न आल्याने हवालदिल झालेल्या ‘न्यू इंडिया’च्या ठेवीदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

सारस्वत बँकेकडून विलीन करून घेतली गेलेली ‘न्यू इंडिया’ ही सहकार क्षेत्रातील आठवी बँक आहे. या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक या नात्याने संकटात सापडलेल्या ‘न्यू इंडिया’ला विलीन करून घेण्याचे पाऊल सारस्वत बँकेने टाकले आणि रिझर्व्ह बँकेनेही बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ मधील तरतुदींनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत या विलीनीकरण योजनेला मंजुरी दिली, असे सारस्वत बँकेने शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. या विलीनीकरण योजनेची ४ ऑगस्टपासून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू होईल.

विलीनीकरणाच्या योजनेस, २२ जुलै २०२५ रोजी झालेल्या सारस्वत बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मान्यता दिली तसेच न्यू इंडियाच्या भागधारकांनीही त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत योजनेस मान्यता दिली. त्यानंतर हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

योजनेसंबंधाने इतर तपशील सारस्वत बँकेकडून देण्यात आलेला नाही. तथापि बँकेच्या ठेवीदारांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल आणि खात्यातील ठेवींबाबत त्यांना कोणतेही नुकसान सोसावे लागणार नाही, अशी ग्वाही सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पुढाकाराने १९६८ साली स्थापित ‘न्यू इंडिया’ या बहुराज्यीय दर्जा असलेल्या बँकेत १२२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. त्यासरशी रिझर्व्ह बँकेने १५ फेब्रुवारीला या बँकेवर निर्बंध आणले. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई करताना, कारभार प्रशासकाच्या हाती सोपविण्यात आला. या बँकेत झालेल्या गैरव्यवहारांचा विविध तपास यंत्रणांकडून सध्या चौकशी सुरू असून, विलीनीकरणापश्चात या तपासात कोणताही अडथळा येणार नाही, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. संशयित घोटाळेबाज संचालक, सभासद, माजी अधिकाऱ्यांना कठोर शासन होईल आणि बँकेतील त्यांच्या ठेवींना त्यांना हात लावता येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेवी न काढून घेण्याचे आवाहन

सारस्वत बँकेच्या नावाने ‘न्यू इंडिया’चे कामकाज सुरू होत असले तरी या बँकेच्या सर्व ठेवीदारांनी पहिल्याच दिवशी बँकेत गर्दी करून आपल्या ठेवी काढण्याची घाई करू नये, असे आवाहन ‘मुंबई ग्राहक पंचायत’ने केले आहे. सारस्वत बँकेसारख्या विश्वसनीय बँकेच्या पुढाकारामुळेच या ठेवीदारांना संपूर्ण सुरक्षितता लाभली आहे. हे लक्षात घेऊन ठेवीदारांनी आपल्या गरजेपुरत्याच रकमा सध्या काढून सारस्वत बँकेला आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन या संस्थेने ठेवीदारांना केले आहे.