मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने शुक्रवारी ‘निफ्टी वेव्हज’ निर्देशांक सादर करीत असल्याची घोषणा केली. माध्यम, मनोरंजन आणि ‘गेमिंग’ उद्योगाशी संबंधित ४३ सूचिबद्ध कंपन्यांचा समावेश असलेला हा निर्देशांक या क्षेत्राच्या कामगिरीचे मापन प्रस्तुत करेल.
देशातील सर्वात गतिमान उद्योगांपैकी एक असलेल्या क्षेत्रांच्या कामगिरीची सखोल माहिती देण्यासाठी हा नवीन निर्देशांक तयार करण्यात आला आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी, डिजिटल मंच, संगीत आणि गेमिंग यांनी व्यापलेल्या वैविध्यपूर्ण परिसंस्थेसह, भारतीय माध्यम व मनोरंजन उद्योग गतिमान परिवर्तनातून जात आहे, ज्यामध्ये सर्जनशील नवोपक्रम आणि जलद तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
देशाची पुढील महत्त्वाची निर्यात म्हणजे कल्पनाशक्ती – आपल्या कथा, संगीत, नवोन्मेष आणि सर्जनशील भावना आहेत. वेव्हजच्या माध्यमातून, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अमर्याद डिजिटल भविष्याशी जोडणी करणारा दुवा आकाराला आला आहे. ‘निफ्टी वेव्हज इंडेक्स’च्या प्रस्तुतीमुळे या क्षेत्रातील प्रगतीची मोजदाद आणि अनेक उद्योजक, गुंतवणूकदारांना प्रेरणा देण्यासाठी एक साधन उपलब्ध झाले आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज् परिषदेत बोलताना व्यक्त केले.
‘निफ्टी वेव्हज’ निर्देशांकामधील प्रत्येक कंपनीच्या समभागांचे ‘मूल्य फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन’वर आधारित आहे. निर्देशांकाची आधारभूत तारीख ही १ एप्रिल २००५ आहे आणि आधार मूल्य १,००० आहे. निर्देशांकांची अर्धवार्षिक स्तरावर पुनर्रचना केला जाईल आणि तिमाही आधारावर त्यातील घटक पुनर्संतुलित केले जातील.