पीटीआय, नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर पेट्रोल पंपचालकांना दिले जाणाऱ्या अडतीत (कमिशन) वाढ करण्यात आली आहे. मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतेही बदल होणार नसले तरी आंतरराज्यीय मालवाहतूक तर्कसंगतीकरणामुळे ओडिशा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि काही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलच्या विक्रीवरील अडतीत प्रतिलिटर ६५ पैशांनी, तर डिझेलवर लिटरमागे ४४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सोबतच, सरकारी मालकीच्या कंपन्यांनी आंतरराज्य दरांचे तर्कसंगतीकरण केले आहे, ज्यामुळे काही भागांमध्ये प्रति लिटर ४.५ रुपयांनी इंधनाचे दर कमी होऊ शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) सर्व पंपचालकांना पेट्रोल, डिझेलच्या अडतीत वाढ केल्याचे मंगळवारी उशिरा कळवले. आयओसीसह, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) – या तिन्ही सरकारी कंपन्यांनी बुधवारपासून अडतीत वाढ लागू केली आहे.

हेही वाचा :प्रमुख क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये खुंटली! पायाभूत क्षेत्रांची वाढ सप्टेंबरमध्ये २ टक्क्यांवर मर्यादित

ओडिशाच्या मलकानगिरीमधील कुननपल्ली आणि कालीमेलाचे पेट्रोलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ४.६९ रुपये आणि ४.५५ रुपयांनी कमी होतील; आणि डिझेलचे दर अनुक्रमे ४.४५ रुपये आणि ४.३२ रुपये कमी होतील. त्याचप्रमाणे छत्तीसगडमधील सुकमा येथे पेट्रोलच्या किमतीत २.०९ रुपयांनी आणि डिझेलच्या किमतीत २.०२ रुपयांनी प्रतिलिटर घट होणार आहे. त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मिझोराममध्येही अनेक ठिकाणी किमती कमी केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय तेलमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

आठ वर्षांनंतर वाढ

पेट्रोल पंपचालकांकडून बऱ्याच वर्षांपासून इंधनावरील अडत वाढवण्याबाबत मागणी करण्यात येत होती. मात्र सुमारे आठ वर्षांत पंपचालकांच्या अडतीत पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे. याआधी ५ ऑक्टोबर, २०१६ रोजी कमिशन वाढवण्यात आले होते. सुधारित दर बुधवार, ३० ऑक्टोबरपासून लागू सुरू झाला असून याचा ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त बोजा टाकला जाणार नसल्याचे तेल विपणन कंपन्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : सोन्याची मागणी सप्टेंबर तिमाहीत १८ टक्क्यांनी वाढून २४८ टनांवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीच्या पूर्ततेमुळे पेट्रोल पंपचालकांना आणि देशभरातील ८३,००० हून अधिक पेट्रोलपंपांवर काम करणाऱ्या सुमारे १० लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.

अजय बन्सल, अध्यक्ष, ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन