मुंबई: सप्ताहारंभीच्या सत्रातील तीव्र तेजीनंतर मंगळवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी नफावसुलीने घसरणीसह बंद झाले. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीबाबत येत्या दिवसांत अपेक्षित निर्णयावर लक्ष ठेवून गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती पुन्हा कडाडल्याने गुंतवणूकदारांवर नकारात्मकतेचा प्रभाव होता. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१२.८५ अंशांनी घसरून ८१,५८३.३० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३६९.१४ अंश गमावत ८१,४२७.०१ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९३.१० अंशांची घसरण झाली आणि तो २४,८५३.४० पातळीवर बंद झाला.
भू-राजकीय तणाव आणि जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. आखाती देशांमधील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा जी ७ बैठकीचा दौरा अर्धवट सोडल्यानंतर आणि अमेरिकी लोकांना तेहरानमधून ताबडतोब बाहेर पडण्याचे आवाहन केल्यानंतर चिंता अधिकच वाढली. औषध आयातीवरील संभाव्य अमेरिकी शुल्काबाबतच्या वृत्तामुळे भारतीय औषध समभागांवर ताण येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इस्रायल-इराणमधील वाढत्या तणावामुळे आणि वाढत्या भू-राजकीय घडामोडींमुळे संरक्षण समभागांवर लक्ष केंद्रित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, १८ जूनला निर्णय अपेक्षित असलेल्या फेड बैठकीनंतर बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल, असे मत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये सन फार्मा, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्ह बाजार घसरणीला कारणीभूत ठरले. याउलट, टेक महिंद्र, इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि मारुती यांचे समभाग वधारल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) २,५३९.४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) ५,७८०.९६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
आकडे-
सेन्सेक्स ८१,५८३.३० -२१२.८५ (-०.२६%)
निफ्टी २४,८५३.४० -९३.१० (-०.३७%)
तेल ७४.४७ १.६९
डॉलर ८६.२३ १९