कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांमधून स्वयंचलित निपटाऱ्यासह आगाऊ रक्कम काढणे सुलभ करण्यासह, त्यासाठी ठरविलेली १ लाख रुपयांची मर्यादाही ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) निर्णयामुळे, पीएफ खात्यातून रक्कम आगाऊ मिळविण्याचा दाव्याचे तीन दिवसांत निवारण होऊन, त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम सभासदांना काढता येणार आहे. सध्या, अग्रिम काढण्याची सोय असली तरी ही मर्यादा केवळ १ लाख रुपये आहे. ईपीएफओ सदस्यांना, विशेषतः तातडीच्या गरजांच्या वेळी, निधी उपलब्धता सुलभ आणि गतिमान करण्यासाठी ईपीएफओने अग्रिम दाव्यांच्या स्वयंचलित निवारणाच्या मर्यादेत वाढ केली गेली आणि या सुविधेचा कोट्यवधी पीएफधारक सभासदांना फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
सुमारे सात कोटींहून अधिक सदस्य असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने करोनाकाळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांना त्वरित मदत करण्यासाठी अग्रिम काढण्याच्या दाव्यांचे स्वयंचलित प्रणालीद्वारे निवारणाची सेवा सुरू केली. तेव्हापासून, आजारपण, शिक्षण, विवाह आणि गृहनिर्माण उद्देशांसाठी पीएफ खात्यातून अग्रिम मिळवण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवण्यात आली. कोणत्याही मानवी सहभागाशिवाय स्वयंचलित प्रक्रियेतून या दाव्यांचा निपटारा केला जातो.
आतापर्यंत किती दावे निकाली?
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, ईपीएफओने स्वयंचलित प्रणालीद्वारे विक्रमी २.३४ कोटी अग्रिम दाव्यांवर प्रक्रिया करून ते मंजूर केले. जे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निकाली काढलेल्या ८९.५२ लाख दाव्यांच्या तुलनेत १६१ टक्क्यांनी जास्त आहेत. वर्ष २०२४-२५ मध्ये सर्व अग्रिम दाव्यांपैकी ५९ टक्के दावे स्वयंचलित प्रणालीद्वारे निकाली काढण्यात गेले, ज्याचे प्रमाण २०२३-२४ मध्ये ३१ टक्के होते. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या अडीच महिन्यांतच, ईपीएफओने ७६.५२ लाख दावे स्वयंचलितरित्या निकाली काढले, जे आतापर्यंत निकाली काढलेल्या सर्व आगाऊ दाव्यांच्या तुलनेत ७० टक्के इतके आहेत.
यूपीआय, एटीएमच्या माध्यमातून निधी काढणे शक्य
पीएफधारक लवकरच त्यांच्या ईपीएफ खात्यांशी संलग्न बँकांचे एटीएम किंवा यूपीआय सारख्या इतर मार्गांनी त्यांच्या पीएफ खात्यांतून थेट पैसे काढू शकणार आहेत. भविष्य निर्वाह निधीमधील एका ठरावीक मर्यादेपर्यंत निधी गोठवला जाईल आणि उर्वरित निधी यूपीआय किंवा एटीएम डेबिट कार्ड सारख्या विविध मार्गांनी सुलभपणे उपलब्ध होऊ शकणार आहे. सध्या या प्रणालीवर काम सुरू आहे. तथापि पीएफ खात्यातून निधी मिळविण्यासाठी सध्या दावा म्हणून अर्ज करावा लागतो, ही वेळखाऊ प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करण्याचा हा प्रयत्न आहे.