पीटीआय, बर्न (स्वित्झर्लंड)

देशात थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ कायम असून जागतिक व्याजदरातील बदलांमुळे कधीकधी त्यात चढ-उतार होत असतात, मात्र तो घटलेला नाही, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिपादन केले.

सध्या गोयल स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी स्विस नेते आणि कंपन्यांशी भेटी घेत आहेत. देशात पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. गुंतवणुकीत वाढीसाठी सरकारने विविध स्तरातून सूचनांचे स्वागत केले असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपाययोजना स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या ११ आर्थिक वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२५ दरम्यान, भारताने ७४८.७८ अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली, जी त्या आधीच्या ११ वर्षांच्या (२००३-१४) तुलनेत १४३ टक्क्यांनी अधिक आहे. आधीच्या ११ वर्षात ३०८.३८ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आली होती.

याबरोबरच, २०१३-१४ मध्ये ८९ देशांमधून गुंतवणूक येत होती, तर आता २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ११२ वर पोहोचली आहे. ज्यामुळे गुंतवणुकीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून भारताचे जागतिक आकर्षण वाढत आहे, असे गोयल यांनी ठळकपणे नमूद केले.

सध्याच्या आकडेवारीनुसार, ‘एफडीआय’मध्ये कोणतीही घट झाल्याचे दिसून येत नाही. समजा काही देशांमध्ये रोखे उत्पन्नावरील परतावा वाढल्यास पुन्हा त्या देशांमध्ये गुंतवणूक मागे परतते. हे चढ-उताराचे चक्र अविरत सुरू असते. मात्र भारतात पैसा परत येत असल्याचेही दिसत आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये, भारताला एकूण ८१ अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूक कोणत्या देशांमधून?

सिंगापूरमधून भारताने सर्वाधिक १४.९४ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली. त्यानंतर मॉरिशस (८.३४ अब्ज डॉलर), अमेरिका (५.४५ अब्ज डॉलर), नेदरलँड्स (४.६२ अब्ज डॉलर), संयुक्त अरब अमिराती (३.१२ अब्ज डॉलर), जपान (२.४७ अब्ज डॉलर), सायप्रस (१.२ अब्ज डॉलर), ब्रिटन (७९५ दशलक्ष डॉलर), जर्मनी (४६९ दशलक्ष डॉलर) आणि केमन बेटे (३७१ दशलक्ष डॉलर) यांचा क्रमांक लागतो. उद्योग क्षेत्रवार पाहता, सेवा, व्यापार, दूरसंचार, वाहने, बांधकाम विकास, अपारंपरिक ऊर्जा आणि रसायनांमध्ये परकीय गुंतवणूक वाढली आहे.