मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाची गृहवित्त कंपनी असलेल्या पीएनबी हाऊसिंग फायनान्सने चालू आर्थिक वर्षात एकूण कर्ज वितरणात १७ टक्के दराने वाढण्याचे संकेत देतानाच, परवडणाऱ्या घरांच्या विभागात ते ५,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे.

राष्ट्रीयीकृत पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी असलेल्या या गृहवित्त कंपनीने, परवडणाऱ्या घरांच्या विभागांवर लक्ष केंद्रित करत विशेष उपाययोजनांसह पाऊल टाकले आहे. ‘रोशनी’ या नाममुद्रेसह परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात ‘पीएनबी हाऊसिंग’ने जानेवारी २०२३ मध्ये प्रवेश केला आणि अवघ्या २० महिन्यांत (सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत) ३,००० कोटी रुपयांचा टप्पाही गाठला.

हेही वाचा >>> बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता, ग्राहक सेवेत सुलभता; बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक लोकसभेकडून संमत 

मार्च २०२५ पर्यंत या विभागात गृहकर्ज वितरण ५,००० कोटी रुपये, तर त्यानंतर दोन वर्षांत म्हणजे मार्च २०२७ पर्यंत तिपटीने वाढीसह १५,००० कोटींचा टप्पा गाठला जाईल, असे पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी गिरीश कौसगी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या निमित्ताने महिला अर्जदारांसाठी परवडणाऱ्या गृहकर्जावर विशेष शुल्क आणि व्याजदर सवलत देणारी विशेष योजना देखील कंपनीने सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारचे ‘सर्वांसाठी घर’ मोहीम आणि पंतप्रधान शहरी आवास योजना-२ ची अंमलबजावणी यातून परवडणाऱ्या घरांसाठी मागणी व गृहकर्जालाही चालना मिळेल. पुढील पाच वर्षांत दरसाल २० लाख घरे यातून विकली जातील आणि ‘पीएनबी हाऊसिंग’ला या विभागात वार्षिक ६० ते ७० टक्के दराने कर्ज वितरणात वाढीची शक्यता दिसून येते, असे कौसगी यांनी स्पष्ट केले. या विभागातील शाखा मार्च २०२७ पर्यंत सध्याच्या १०० वरून ३०० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन असून, यातूनही कर्जवाढीस चालना मिळेल, असे ते म्हणाले.