मुंबई: रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी तिच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या खात्यांमध्ये केलेल्या फेरबदलानुसार, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पूनम गुप्ता यांना महत्त्वपूर्ण असलेल्या पतविषयक धोरण विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला. या आधी पतधोरण विभाग जानेवारीमध्ये निवृत्त झालेले मायकल देवब्रत पात्रा हे पाहत होते.
रिझर्व्ह बँकेच्या सेवेत एकूण चार डेप्युटी गव्हर्नर आहेत. त्यापैकी चौथ्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून गुप्ता यांची नियुक्ती आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मध्यवर्ती बँकेने त्यांच्या कार्य विभागांमध्ये हे फेरबदल केले. पतविषयक धोरणाव्यतिरिक्त, गुप्ता यांना उद्यम रणनीती आणि अंदाजपत्रक, संज्ञापन आणि आर्थिक स्थिरता यासह इतर सात विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव हे सहा विभाग पाहतील, ज्यात समन्वय, नियमन, अंमलबजावणी आणि जोखीम देखरेख यांचा समावेश आहे. डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर हे १२ विभाग पाहतील. यामध्ये केंद्रीय सुरक्षा कक्ष, माहिती तंत्रज्ञान, पेमेंट व सेटलमेंट प्रणाली, परकीय चलन विभाग आणि फिनटेक यांचा समावेश आहे. तर स्वामीनाथन जानकीरामन यांच्याकडे ग्राहक शिक्षण, पर्यवेक्षण, तपासणी आणि इतर चार विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही कार्यविभागणी शुक्रवारपासून (२ मे) लागू झाली आहे.