लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: देशातील वाणिज्य बँकांनी त्यांच्याकडील कर्ज आणि मालमत्ता प्रमाण संतुलित राखण्यासाठी वेळीच पावले उचलावीत. असे आवाहन करीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हे संतुलन बिघडल्यामुळे बँकांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागतो आणि अमेरिकेतील ताजे बँकिंग संकट हे याच चुकांमुळे घडले, असा इशारा शुक्रवारी दिला.

फेडरल बँकेचे संस्थापक केपी होर्मिस स्मृती व्याख्यानांत, देशांतर्गत बँकिंग क्षेत्र स्थिर असून, उच्च महागाई दराचा खराब काळ मागे पडला आहे, असे दास यांनी आवर्जून सांगितले. परकीय चलन विनिमय दरात अस्थिरता वाढली आहे. अमेरिकी डॉलर मोठ्या प्रमाणात वधारल्याने ही अस्थिरता आहे. याचा परिणाम देशाच्या बाह्य कर्ज सेवा क्षमतेवर होत आहे. डॉलर बळावत जाणे ही आपल्यासाठी समस्या असली तरी आपण काळजी करावी अशी परिस्थिती नाही आणि आपले बाह्य कर्ज हे योग्य प्रमाणात आहे, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि फर्स्ट रिपब्लिक बँक या संकटात सापडल्या आहेत. दोन्ही बँकांचा ताळेबंद प्रत्येकी सुमारे दोनशे अब्ज डॉलरचा होता. मागील आठवड्यात या दोन्ही बँका अडचणीत आल्या. या बँकिंग संकटावर बोलताना दास म्हणाले की, या संकटाचा विचार करता देशांतर्गत पातळीवर चांगल्या नियमनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कर्ज व मालमत्ता या दोन्हीपैकी एका बाजूवर अवाजवी भर देणारे असंतुलन चुकीचे आहे.

तेथील एका बँकेकडे त्यांच्या कर्ज व्यवसायाच्या तुलनेत खूपच व्यस्त प्रमाणात ठेवी वाढल्या होत्या, इतके स्थितीवर नियंत्रण मिळविणे आटोक्यबाहेर गेले, असे दास यांनी संकटग्रस्त बँकेचा नामोल्लेख न करता सांगितले. अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे क्रिप्टोसारख्या कूटचलनांचा वित्तीय व्यवस्थेला असलेला धोकाही समोर आल्याचे ते म्हणाले.