Businessman Ratan Tata Birthday : भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले रतन टाटा आज २८ डिसेंबर रोजी त्यांचा ८६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रतन टाटा यांच्या परिचयाची तशी काही गरज नाही. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला. जेव्हा रतन टाटा फक्त १० वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे पालक वेगळे झाले, त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

…म्हणून रतन टाटांनी लग्न केले नाही

रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी कधीही लग्न केले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, १९६२ मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका मुलीवर त्यांचे प्रेम जडले होते आणि ते लग्न करणार होते, परंतु भारत-चीन युद्धामुळे मुलीच्या पालकांनी मुलीला भारतात येऊ दिले नाही. यानंतर रतन टाटा भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

अशी झाली करिअरची सुरुवात

रतन टाटा यांनी १९६१ साली टाटा समूहाची प्रसिद्ध कंपनी टाटा स्टीलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ते १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकण्यासाठी गेले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीही मिळवली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून १९९१ हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे होते. देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली या समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे.

हेही वाचाः चांगली बातमी! मोदी सरकार २५ रुपये किलोने तांदूळ विकणार, पीठ अन् डाळीनंतर तांदूळ भारतात येणार

अशा प्रकारे रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एक मोठा ब्रँड बनला

२००४ मध्ये त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला. यासह ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटाने अँग्लो-डच स्टील निर्माता कोरस, ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी जग्वार लँड रोव्हर आणि ब्रिटिश चहा कंपनी टेटली यांसारखे अनेक मोठे जागतिक ब्रँड्स विकत घेतले होते. यानंतर टाटा समूह जागतिक स्तरावर खूप मोठा ब्रँड बनला. २००९ मध्ये सामान्य लोकांची कारची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी टाटाने आपली नॅनो लॉन्च करण्याचा निर्णय घेतला.

सेवाकार्यात नेहमीच पुढे असतात

केवळ व्यवसायच नाही तर रतन टाटा त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.

रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती आहे?

रतन टाटा हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेल्या भारतीय उद्योगपतींपैकी एक आहेत. X वर त्याचे १२ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ३८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, रतन टाटा हे जगातील ४२१ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टाटा सन्स आपल्या कमाईतील ६६ टक्के दान करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata birthday who made tata a brand of trust vrd
First published on: 28-12-2023 at 12:39 IST