मुंबई : मुंबईतला मराठी माणूस वसई- विरारपलीकडे का गेला? याचे उत्तर मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी द्यावे, असे आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वरळीच्या जांबोरी मैदानात मंगळवारी शिवसेना शिंदे गटाच्या मुंबई- दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, बीडीडी चाळीतील रहिवाशांना आम्ही सहाशे फुटांचे घर देत आहोत. आदर्शनगर, अभ्युदयनगर येथील पुनर्विकासाचे काम मार्गी लावले. गिरणी कामगारांना घरे दिली. मुंबईतील २७ पोलीस वसाहतींपैकी १७ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात आला. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले. कोळीवाड्यांसाठी विकास नियंत्रण नियमावली बदलून विस्थापन रोखले.
इंडिया आघाडीकडे २४ इंजिने असून त्यांच्याकडे बोगी नाही. उद्धवच्या इंजिनात फक्त आदित्यसाठी तर शरद पवार यांच्या इंजिनात फक्त सुप्रिया यांना जागा आहे. यामिनी जाधव यांना निवडून दिले तर नरेंद्र मोदी यांच्या इंजिनाला दक्षिण मुंबईची बोगी जोडली जाईल आणि विकासाची गंगा येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि इतरांचे कुटुंब ही मोदींची जबाबदारी या पद्धतीने कामकाज केले. कोविड प्रतिबंधक लस मोदी यांनी बनवली. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान असते तर लसच बनली नसती. इंडिया आघाडीचे नेते नेता निवडू शकत नाहीत असे लोक देशाचा पंतप्रधान काय निवडणार, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
हेही वाचा >>> मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड; छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका
व्यासपीठावर या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मनसेचे बाळा नांदगावकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही संधिसाधू न्यू टर्न सेना आहे, अशी टीका खासदार मिलिंद देवरा यांनी केली. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि संविधान बदलणाऱ्याला आम्ही देशात राहू देणार नाही, असे रिपाइं नेते रामदास आठवले म्हणाले. मुंबई दक्षिणच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांचे पती माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी आभार मानले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला येणार असल्याने भाषणे लांबवण्यात आली. पण ९ वाजून ५८ मिनिटांनी शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले. आचारसंहितेमुळे शिंदे यांनी भाषण टाळून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. तुम्हाला काय करायचे आहे हे माहीत आहे, इतकेच शिंदे व्यासपीठावरून म्हणाले.