मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे चालू वर्षांत रेपो दरात सलग पाचव्यांदा वाढ केल्यानंतर बुधवारी त्यावर भांडवली बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सला त्यातून २१५ अंशांची झळ बसली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीचा निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसला.

जागतिक आघाडीवर प्रमुख आशियाई भांडवली बाजारांमधील घसरण आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारातील वातावरण निराशाजनक राहिले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१५.६८ अंशांनी घसरून ६२,४१०.६८ पातळीवर बंद झाला. प्रचंड अस्थिर राहिलेल्या सत्रादरम्यान सेन्सेक्सने ६२,३१६.६५ अंशांची नीचांकी तर ६२,७५९.९७ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८२.२५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,५६०.५० अंशांवर स्थिरावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी विकासदराचा अंदाज ७ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. तसेच महागाई विरोधातील रोख कायम ठेवताना, तिला नियंत्रणात राखण्यासाठी भविष्यात आणखी व्याजदर वाढीचे संकेत मध्यवर्ती बँकेने दिले आहेत. जागतिक पातळीवरील संभाव्य मंदीच्या शक्यतेने आगामी तिमाही आणि पुढील आर्थिक वर्षांत कंपन्यांच्या कमाईमध्ये घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या बाजाराचे मूल्यांकन महागडे असून कंपन्यांच्या महसूल घसरणीचा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एनटीपीसीच्या समभागात २ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसव्‍‌र्ह, इंडसइंड बँक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्मा या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.