मुंबई : रिझर्व्ह बँकेने डिसेंबर महिन्यात व्याजदर कपातीचे दिलेले संकेत, वस्तू व सेवा करातील कपातीमुळे वाहनांसह विविध वस्तूंच्या किमतीत झालेली घट, नियंत्रणात असलेली महागाई यांचा एकत्रित परिणाम यंदा दसरा-दिवाळीतील खरेदीवर दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आली असल्याने सणासुदीच्या काळात बाजारात तेजी अवतरणार आहे.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी द्विमासिक धोरण जाहीर करताना बँकांना होणाऱ्या कर्जपुरवठ्याच्या व्याजाचा रेपो दर ‘जैसे थे’ ठेवला. मात्र, त्याचवेळी डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीला पूर्ण वाव असल्याचे संकेतही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले आहेत. देशांतर्गत महागाई नियंत्रणात आली असली तरी अमेरिकेच्या आयातशुल्कामुळे जागतिक अर्थकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेपोटी सावध पवित्रा स्वीकारल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

परिस्थिती नियंत्रणात राहिली तर, डिसेंबरमध्ये पाव टक्क्याची व्याजदर कपात निश्चित असेल, असा बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सामान्यांच्या कर्जावरील व्याजात एक टक्क्याची कपात झाली असून त्यात डिसेंबरमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम गृह, वाहन, वैयक्तिक तसेच ग्राहकोपयोगी उपकरणांच्या खरेदीवर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा करात केलेल्या कपातीमुळे अनेक दैनंदिन वस्तूंचे दर कमी झाले आहेत. विशेषत: वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहुर्तावर या खरेदीत उत्साह दिसण्याची बाजाराला आशा आहे.

मुंबई शेअर बाजारनेही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचे स्वागत केले. बँकांच्या कर्जपुरवठ्याला चालना आणि अर्थव्यवस्थेत वित्त प्रवाह सुधारण्यासाठी पतधोरणात महत्त्वाच्या घोषणा केल्याने भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ला बळ मिळाले. मध्यवर्ती बँकेने अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज पूर्वअनुमानित ६.५ टक्क्यांवरून, ६.८ टक्क्यांवर नेला असून, महागाई दर आणखी २.६ टक्क्यांपर्यंत ओसरण्याचा नव्याने अंदाज व्यक्त केला आहे. चोहीकडे उत्साहाने भारलेल्या वातावरणामुळे ‘सेन्सेक्स’ने थेट ७१५ अंशांची मुसंडी मारली.