रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील दूरसंचार आणि डिजिटल कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने विद्यमान वर्षातील नियोजित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना लांबणीवर टाकली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विश्लेषकांच्या मते, १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेली जिओ आपल्या दूरसंचार व्यवसायासाठी अधिक महसूल आणि मोठा ग्राहकवर्ग मिळवू इच्छित आहे आणि इतर डिजिटल सेवांचा देखील विस्तार करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून आयपीओपूर्वी तिचे मूल्यांकन आणखी वाढू शकेल, असे आयपीओसाठी विलंबाचे कारण सांगणाऱ्या पहिल्या सूत्राने सांगितले.
जिओ प्लॅटफॉर्मच्या १७.६ अब्ज डॉलरच्या वार्षिक उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के महसूल त्यांच्या दूरसंचार व्यवसायातून मिळवला आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेली रिलायन्स जिओ इन्फोकॉम डिजिटल व्यवसायांचादेखील वेगाने विस्तार करत आहेत, जे ॲप, कनेक्टेड डिव्हाइसेस आणि कृत्रिम विदा (एआय) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
रिलायन्स जिओ येत्या काही महिन्यांत भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू करण्याची अपेक्षा असलेल्या एलन मस्कशीदेखील टक्कर घेण्यास सज्ज आहे. गुंतवणूकदारांमध्ये गूगल आणि मेटा यांचा समावेश असलेल्या जिओने ‘एआय’ पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एनव्हिडियासोबत भागीदारीदेखील केली आहे. वर्ष २०१९ मध्ये, मुकेश अंबानी यांनी जिओ येत्या पाच वर्षांत सूचिबद्धतेसाठी वाटचाल करेल, असे म्हटले होते. जिओचे मूल्यांकन वाढल्यास तो भारतातील सर्वात मोठे आयपीओ ठरण्याची आशा आहे.
रिलायन्स जिओची ‘आयपीओ’ योजना लांबणीवर पडण्याच्या वृत्ताने मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग बुधवारच्या सत्रात १.२१ टक्क्यांनी घसरला आणि तो १,५१९ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २०.५५ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.