मुंबई : मर्यादित इंटरनेट सुविधा असलेल्या भागातही लवकरच डिजिटल रुपयाचा वापर शक्य बनवणारे ऑफलाइन व्यवहार करता येऊ शकतील आणि याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाची घोषणा रिझर्व्ह बँकेने गुरुवारी केली.

रिझर्व्ह बँकेने किरकोळ डिजिटल चलन अर्थात ई-रुपयाचा वापर डिसेंबर २०२२ पासून खुला केला आणि डिसेंबर २०२३ अखेर या चलनाचे दैनंदिन व्यवहार १० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठण्यात आले. याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, नियोजित पथदर्शी प्रकल्पात डिजिटल रुपयाच्या वापराचे अतिरिक्त पर्याय सादर करण्यात येतील. डिजिटल रुपयाचे ऑफलाइन व्यवहार ग्राहकांना करता येतील. इंटरनेटचे जाळे कमी अथवा मर्यादित असलेल्या भागात यामुळे ई-रुपयाच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतील. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील डोंगराळ ठिकाणी या व्यवहारांची चाचणी घेण्यात येईल.

हेही वाचा >>>पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद

सध्या ई-रुपयाचे व्यवहार व्यक्ती ते व्यक्ती, व्यक्ती ते व्यापारी असे सुरू आहेत. बँकेच्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून हे व्यवहार होत आहेत. आता ऑफलाइन व्यवहाराचा पर्यायही देण्यात आला आहे, असे दास यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (यूपीआय) काही ऑफलाइन व्यवहार करणे शक्य बनले आहे.