वृत्तसंस्था, नवी दिल्ली
किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या मर्यादारेषेच्या आत राहिल्याचे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. यामुळे बँकेकडून आगामी काळात आणखी व्याजदर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये ३.१६ टक्के नोंदविण्यात आला. आधीच्या म्हणजेच मार्च महिन्यात हा दर ३.३४ टक्के होता. ही महागाई दराची जुलै २०१९ नंतरची म्हणजेच मागील सहा वर्षांतील नीचांकी पातळी आहे. तर सात महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये किरकोळ महागाई दराने ६.२१ टक्के असा १४ महिन्यांतील उच्चांक नोंदविला होता.
मार्चप्रमाणेच खाद्यान्न महागाईतील घसरणीचा हा सुपरिणाम आहे. हा दर मार्चमध्ये २.६९ टक्के होता, तर एप्रिलमध्ये तो १.७८ टक्क्यांपर्यंत खाली आला. म्हणजेच महिनागणिक खाद्यान्न महागाईत तब्बल ९१ आधार बिंदूंची (०.९१ टक्के) मोठी घट झाली आहे. खाद्यान्न महागाईची ऑक्टोबर २०२१ नंतरची ही नीचांकी पातळी आहे. भाज्यांच्या किमतीही नरमल्याने एकंदर महागाई दरात घसरण सुरू आहे.
किरकोळ महागाईतील घसरणीमुळे रिझर्व्ह बँकेकडून जूनमधील पतधोरणामध्ये व्याजदरात आणखी पाव टक्का कपात केली जाऊ शकते, असे निरीक्षण एचडीएफसी बँकेच्या अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी नोंदविले. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीपासून पतधोरण आढाव्याच्या सलग दोन बैठकांमध्ये व्याजदरात प्रत्येकी पाव टक्क्यांची कपात केली आहे. मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून कमी करून ६.५ टक्क्यांवर आणला. तसेच, बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी महागाई दराचा अंदाजही ४.२ टक्क्यांवरून कमी करून ४ टक्क्यांपर्यंत खालावला आहे.
ग्रामीण भागाला वाढीव सुख
सरलेल्या एप्रिलमध्ये देशाच्या ग्रामीण भागासाठी मुख्य आणि खाद्यान्न महागाईचा दर लक्षणीय असा २.९२ टक्के पातळीपर्यंत घटला आहे. मार्च २०२५ मध्ये त्याची पातळी ३.२५ टक्के होती. शहरी महागाई दर एप्रिल २०२५ मध्ये ३.३६ टक्के राहिला, जो आधीच्या मार्चमध्ये ३.४३ टक्के होता. तथापि, खाद्यान्न महागाईत मार्चमधील २.४८ टक्के पातळीवरून एप्रिलमध्ये १.६४ टक्के इतकी मोठी घट दिसून आली आहे.
अर्थविश्लेषकांचे म्हणणे काय?
यंदा सरासरीएवढा मोसमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत किरकोळ महागाईचा दर ३.६ ते ३.८ टक्क्यांदरम्यान राहणे अपेक्षित आहे.
रजनी ठाकूर, अर्थतज्ज्ञ, एल अँड टी फायनान्स
उत्तर भारतातील तापमानातील अलिकडची तीव्र वाढ आणि भारतातील काही भागात झालेला अवकाळी पाऊस यामुळे मे महिन्यात भाज्यांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाईचा दर ३.५ टक्क्यांपर्यंत वाढणे शक्य आहे.
अदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा लिमिटेड