सध्याच्या पाचशे रुपयांच्या चलनातील नोटांचा पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकाने स्पष्ट केले आहे. एटीएममध्ये १०० किंवा २०० रुपयांसोबत ५०० रुपयांची नोट देखील नेहमीप्रमाणे प्राप्त होईल, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली.

रिझर्व्ह बँक सप्टेंबर २०२५ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा वितरित करणे बंद करण्याचा विचार करत असल्याचा दावा केला जात होता. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित होणाऱ्या संदेशामुळे गोधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ३० सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के एटीएममधून आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा हळूहळू बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लोकांनी पाचशे नोटा वापरणे आधीच बंद करावे, असा दिशाभूल आणि लोकांना संभ्रमात टाकणारा संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवला जात होता. मात्र आता हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेचे प्रसिद्धीपत्रक नेमके काय?

एटीएमद्वारे १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे वितरण वाढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक प्रसिद्धीपत्रक प्रसूत केले होते , ज्यामध्ये सर्व बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना (डब्ल्यूएलएओ) त्यांच्या एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे नियमित वितरण होईल, खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या महत्त्वाच्या टप्प्यांनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ७५ टक्के एटीएममधून किमान एका कॅसेटमधून १०० किंवा २०० रुपयांच्या नोटा वितरित केल्या जाणार आहेत. ३१ मार्च २०२६ पर्यंत, ९० टक्के एटीएममधून किमान एका कॅसेटमधून १०० किंवा २०० रुपयांच्या नोटा वितरित केल्या जातील असे त्यांनी सांगितले. मात्र या बरोबरच पाचशे रुपयांच्या चलनी नोटा देखील एटीएममधून प्राप्त होणार आहेत.