मुंबई : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि मजबूत अमेरिकी डॉलरच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रुपया ४७ पैशांनी घसरून ८५.८७ प्रतिडॉलरवर विसावला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी शुल्कावरील अनिश्चिततेमुळे परदेशी निधीचे निर्गमन सुरू असल्याने रुपयावरील दबाव आणखी वाढला.
परकीय चलन बाजारात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८५.५३ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात ८५.५१ ते ८६.०३ या श्रेणीत व्यवहार करत ८५.८७ पातळीवर बंद झाला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.४० वर स्थिरावला होता.
ऑगस्ट महिन्यात खनिज तेलाच्या उत्पादनात वाढ झाली असूनही आणि सप्टेंबरमध्ये उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा असतानाही सौदी अरेबियाने तेलाच्या किमती वाढवल्या आहेत, त्यामुळे तेल कंपन्या आणि आयातदारांकडून सतत खरेदी होत असल्याने रुपया घसरला, असे फिनरेक्स ट्रेझरी ॲडव्हायझर्सचे कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी सांगितले. शिवाय सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.२४ टक्क्यांनी वाढून ९७.४१ वर पोहोचला.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स गटाच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळवून घेणाऱ्या देशांवर अतिरिक्त १० टक्के कर लादण्याची धमकी दिल्याने डोकेदुखी वाढवली आहे.