मुंबई : आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाचा ‘मॅग्नम हायब्रिड लाँग शॉर्ट फंड’ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड अर्थात ‘एआयएफ’च्या कार्य चौकटीअंतर्गत दाखल या फंड घराण्याचा हा पहिला फंड आहे. फंडाच्या जाहीर करण्यात आलेल्या गुंतवणूक धोरणानुसार, समभाग आणि रोखे अशा दोन्ही पर्यायांचे गुंतवणुकीत प्राबल्य राहणार असून, वायदे बाजार अर्थात डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून जोखीम कमी करण्याचे तंत्र वापरले जाणार आहे.
‘मॅग्नम हायब्रिड लाँग शॉर्ट फंड’ येत्या १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. वायदे बाजारातील कव्हर्ड कॉल, कॉलर या रणनीतींच्या आधारे जोखीम मर्यादित राखून आणि रोखे बाजारात आर्बिट्राज म्हणजे एकाचवेळी वेगवेगळ्या शेअर बाजारांत सारख्याच प्रकारच्या मालमत्तांची खरेदी-विक्री करण्याची संधी आणि रोखे बाजार, मनी मार्केट साधनांसारख्या पोर्टफोलियोतील प्राबल्याने गुंतवणूक करून नियमित उत्पन्न निर्माण करणे आणि दीर्घकालीन भांडवलातील मूल्यवृद्धी साधणे हे या गुंतवणूक धोरणाचे गुंतवणूक उद्दिष्ट आहे.
मॅग्नम हायब्रिड लाँग शॉर्ट फंड दैनंदिन खरेदीची मुभा देते, तर आठवड्यातून दोनदा (सोमवार व गुरुवार) फंडातून पैसे काढून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम १० लाख रुपये आहे. एकरकमी पैसे भरून किंवा ‘एसआयपी’च्या माध्यमातून ही गुंतवणूक करता येईल. ‘निफ्टी ५० हायब्रिड कम्पोझिट डेट ५०:५० इंडेक्स टीआरआय’ हा या गुंतवणूक धोरणासाठी मानदंड निश्चित करण्यात आला आहे.
या फंडात प्रथमत: आपल्या एकूण मालमत्तेपैकी ६५ टक्के ते ७५ टक्के मालमत्ता इक्विटी आणि इक्विटी संबंधित गुंतवणूक साधनांमध्ये गुंतविली जाईल. संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी हेज/आर्बिट्रेजमधील गुंतवणुकीचा भाग म्हणून इंडेक्स फ्युचर्स, स्टॉक फ्युचर्स, इंडेक्सचे पर्याय, स्टॉकचे पर्याय आणि वायदे बाजारात गुंतवला जाईल. गौरव मेहता यांच्याद्वारे मॅग्नम हायब्रिड लाँग शॉर्ट फंड व्यवस्थापित केला जाईल.