मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने तिची प्रतिस्पर्धी बँक असलेल्या येस बँकेतील सुमारे १८,४०० कोटी रुपये (२.२ अब्ज डॉलर) मूल्याचे समभाग मार्चअखेरीस विकण्याचे नियोजन आखले आहे. सूत्रांच्या हवाल्यानुसार, त्या बँकेतील सुमारे २४ टक्के हिस्सेदारी विकण्यात येईल.

सूत्रांनी (रॉयटर्स) दिलेल्या माहितीनुसार, जपानी कंपनी सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्प आणि दुबईस्थित एमिरेट्स एनबीडी हे येस बँकेतील बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्यासाठी उत्सुक असून, त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. सुमितोमो मित्सुई हे सुमितोमो मित्सुई फायनान्शियल समूहाचा एक भाग असून, ती जपानमधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. दोन्ही संभाव्य गुंतवणूकदार बँकेवर नियंत्रण हक्क मिळवण्यासाठी येस बँकेतील ५१ टक्के भागभांडवल खरेदी करण्यात उत्सुक आहेत. रिझर्व्ह बँकेने प्रस्तावाला तोंडी मंजुरी दिली असून कायदेशीर बाजूने अजून त्यावर काम सुरू असल्याचे सूत्रांची सांगितले. स्टेट बँकेकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

येस बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर रिझर्व्ह बँकेने मार्च २०२० मध्ये इतर बँकांच्या मदतीने तिची पुनर्रचना केली. याअंतर्गत स्टेट बँकेने सर्वाधिक २४ टक्के हिस्सेदारी खरेदी केली. शिवाय आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेसह ११ इतर बँकांनीदेखील त्यात हिस्सेदारी मिळविली. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेची एकत्रित ९.४७ टक्के हिस्सेदारी आहे. दोन खासगी इक्विटी फंड असलेल्या सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्स आणि व्हर्वेंटा होल्डिंग्सकडे एकत्रितपणे १६.०५ टक्के हिस्सेदारी असून उर्वरित भागधारणा काही अन्य तसेच किरकोळ गुंतवणूकदारांकडे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येस बँकेतील हिस्सा विक्रीतून स्टेट बँकेला सुमारे १०,००० कोटी रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा आहे. येस बँक अडचणीत आली असताना आणि तरलतेची कमतरता भरून काढण्यासाठी त्या वेळी स्टेट बँकेने मदत केली. सध्याच्या येस बँकेच्या समभागाच्या २४.६० रुपयांच्या बाजारभावानुसार येस बँकेचे बाजार भांडवल सुमारे ७७,००० कोटी रुपये आहे.