मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ‘लाइव्ह स्टॉक मार्केट डेटा’चा वापर मर्यादित केला आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा ‘सेबी’ने परिपत्रकाद्वारे जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार, शेअर बाजारासंबंधित शिक्षण देताना फिनफ्लुएन्सर केवळ तीन महिन्या आधीच्या समभागांसंबंधित आकडेवारी वापरू शकतात, ज्यामुळे त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली ‘रिअल-टाइम ट्रेडिंग टिप्स’ देण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

भांडवली बाजाराकडे आकर्षित होऊन, एकीकडे अनेक हवशेनवशे बाजारातील जोखमीकडे दुर्लक्ष करून आणि ती न समजून घेता ट्रेडिंग करू लागले आहेत, तर दुसरीकडे स्वयंघोषित तज्ज्ञ बाजार नियामक ‘सेबी’च्या परवानगी किंवा मान्यतेविना प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमाद्वारे त्यांना शेअर खरेदी-विक्रीसंबंधित टिप्स देऊन ईप्सित साधताना दिसतात. गुंतवणूकदारांचे हात पोळून काढणाऱ्या या प्रकाराची दखल घेत ‘सेबी’ने गेल्या वर्षीपासून कडक कारवाईस सुरुवात केली आहे. फिनफ्लुएन्सर समाजमाध्यमांत असलेल्या त्यांचा प्रभावाचा फायदा घेत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सल्ला देण्याचे काम करतात. त्यातील अनेक जण गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. त्याला भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि फसतात. हे फिनफ्लुएन्सर यूट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर गुंतवणुकीबाबत सल्ला देतात. त्यांच्याकडून शेअर बाजारासंबंधी अनेक अभ्यासक्रमदेखील चालविले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो आणि यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना भुलविले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिपत्रकात नेमके काय?

शेअर बाजारासंबंधित शिक्षण देताना त्याव्यक्तीने मागील तीन महिन्यांच्या शेअर बाजारभावाच्या आकडेवारीचा वापर करत कोणत्याही कंपनीच्या समभागाचे नाव किंवा त्यासंबंधित माहिती देऊ नये. शिवाय भाषणात, व्हिडिओमध्ये, टिकरमध्ये, स्क्रीन शेअरमध्ये भविष्यातील किंमत, सल्ला किंवा कंपनीसंबंधित शिफारस दर्शविणारा कोणताही सांकेतिक शब्द (कोड) वापरण्याला बंदी असेल. ‘सेबी’च्या या उपाययोजनांमुळे अनेक फिनफ्लुएन्सर नोंदणीशिवाय चालवत असलेले बेकायदेशीर सल्लागार व्यवसाय बंद करतील, अशी अपेक्षा आहे. सेबीने ऑक्टोबर २०२४ च्या परिपत्रकात नोंदणीकृत नसलेल्या संस्थांवर निर्बंध लादले होते. समाज माध्यमांवर फिनफ्लुएन्सरच्या वाढीमुळे आर्थिक शिक्षण आणि गुंतवणूक सल्ला यांच्यातील रेषा अस्पष्ट झाली आहे, ज्यामुळे विश्वासार्ह स्रोत आणि दिशाभूल करणारे स्रोत वेगळे करणे कठीण झाले आहे.

सेबीच्या नवीनतम परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे:

  • शेअर बाजारासंबंधित माहिती देणारे शिक्षक थेट समभागांच्या किमती वापरू शकत नाहीत. तीन महिन्यापर्यंतची आकडेवारी दाखवता येणार नाही.
  • नोंदणीकृत बाजारातील संस्था कोणत्याही प्रकारे फिनफ्लुएन्सरसोबत आर्थिक हितसंबंध जोडू शकत नाहीत.
  • गुंतवणूकदारांना शिक्षणाची परवानगी आहे, परंतु शिक्षकांनी सेबीच्या मान्यतेशिवाय गुंतवणूक सल्ला देऊ नयेत.
  • शिक्षक गेल्या तीन महिन्यांतील समभागासंबंधित माहिती, किंमतीसंबंधित इतर आकडेवारी, गुणोत्तरे कोणत्याही स्वरूपात वापरू शकत नाहीत, ज्यामुळे तो गुंतवणूक सल्ला सूचित होऊ शकेल.
  • या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थांना दंड, निलंबन किंवा त्यांचा सेबी परवाना रद्द केला जाऊ शकतो.