मुंबई : भांडवली बाजारात असूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री लवकरच शक्य होणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबी कंपन्यांच्या समभागांच्या प्रारंभिक समभाग विक्रीपूर्व व्यवहार करण्यासाठी मंच उभारण्याची योजना आखत आहे. ठराविक नियमांची पूर्तता केल्यांनतर ही परवानगी दिली जाऊ शकते, असे सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी सांगितले.
सेबीकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. विशेषतः लहान गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी सूचिबद्धतेपूर्व अर्थात प्री-लिस्टिंग माहिती अनेकदा पुरेशी नसते, असे फिक्कीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पांडे म्हणाले.
आयपीओ पूर्व कंपन्या विशिष्ट अटीशर्ती आणि खुलाशांच्या अधीन राहून व्यवहार करू शकतात. या उपक्रमामुळे कंपन्यांना निधी संकलन करणे सोपे होईल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, भांडवलाची मागणी आणि पुरवठा दोन्ही निर्माण करणारे उदयोन्मुख क्षेत्रे, उत्पादने आणि मालमत्ता वर्गांचा शोध घेता येईल. या नवीन मंचामुळे गुंतवणूकदारांना आयपीओ वाटप आणि सूचिबद्धतेदरम्यानच्या तीन दिवसांच्या कालावधीत समभागांची देवाणघेवाण करण्याची परवानगी मिळू शकते. हा उपक्रम सध्या कार्यरत असलेल्या अनियमित ग्रे मार्केटची जागा घेऊ शकतो.
ग्रे मार्केट म्हणजे काय?
नावच सूचित करते त्याप्रमाणे ‘ग्रे मार्केट’ अनधिकृत आणि अनियंत्रित बाजारमंच आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या नियमनाधीन राष्ट्रीय बाजारमंचांना समांतर असा हा बाजारमंच आहे. परंतु प्राथमिक बाजारात दाखल होणाऱ्या कोणत्याही नवीन कंपनीचा शेअर अधिकृत बाजारात सूचिबद्ध होण्याआधीच त्याची खरेदी-विक्री ‘ग्रे मार्केट’मध्ये होत असते. हे व्यवहार भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या कक्षेबाहेर अनधिकृतरित्या पार पडतात.
सध्या अनेक नवनवीन कंपन्या ‘प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ)’ आणून गुंतवणूकदार वर्गाला आजमावत आहेत. प्राथमिक बाजारात त्यामुळे कधी नव्हे इतकी सुगी अनुभवली जात आहे. ‘आयपीओ’साठी गुंतवणूकदारांची झुंबड उडणे आणि विक्रीसाठी उपलब्ध समभागांच्या तुलनेत कैकपटींनी अर्ज भरणा होणे हे अलीकडे सर्रासपणे दिसू लागले आहे. विशेषत: अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये ‘ग्रे मार्केट प्रीमियम’वर (जीएमपी) चर्चा झडू लागल्या आहेत. ‘आयपीओ’च्या आलेल्या महापुरामुळे, ग्रे मार्केटमधील किंमत बघून अर्ज करण्याचा निर्णय घेणारेही अनेकजण आहेत.