मुंबई: मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची पीछेहाट होऊन त्यात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. निर्देशांकात सर्वाधिक योगदान असणाऱ्या एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांतील विक्रीमुळे घसरणीला चालना मिळाली.
सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८७२.९८ अंश म्हणजेच १.०६ टक्क्यांनी घसरून ८१,१८६.४४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ९०५.७२ अंश गमावत ८१,१५३.७० अशी सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २६१.५५ अंशांच्या (१.०५ टक्के) घसरणीने २४,६८३.९० वर स्थिरावला. विश्लेषकांच्या मते, गुंतवणूकदारांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर अधिक स्पष्टतेची वाट पाहत असल्याने नफावसुलीला प्राधान्य दिले.
देशांतर्गत आघाडीवर मोठ्या सकारात्मक घडामोडींचा अभाव आणि अमेरिकेच्या आर्थिक स्थिरतेबाबत अनिश्चितता असल्याने, गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत नफावसुलीला प्राधान्य दिले. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अधिक स्पष्टतेची वाट पाहत बाजारात विक्रीचा दबाव वाढला. सध्याचे बाजाराचे मूल्यांकन आणि व्यापार करारातील विलंब पाहता, बाजारात निराशेचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नव्याने ओघ थांबवला आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यापैकी, इटर्नलमध्ये ४.१० टक्क्यांनी घसरण झाली. त्यापाठोपाठ मारुती, महिंद्र अँड महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, नेस्ले, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एशियन पेंट्स यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद आले. तर टाटा स्टील, इन्फोसिस आणि आयटीसी यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.
गुंतवणूकदार ५.६४ लाख कोटींनी गरीब
भांडवली बाजारातील मंगळवारच्या सत्रातील तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.६४ लाख कोटी रुपयांची घट झाली. सेन्सेक्सने ८२ हजार अंशाची पातळी सोडत, ८१,१८६.४४ पातळीवर स्थिरावला. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ५.६४ लाख कोटी रुपयांनी घटून ४३८.०३ लाख कोटी रुपयांपर्यंत (५.१३ ट्रिलियन डॉलर) खाली आले.
सेन्सेक्स ८१,१८६.४४ -८७२.९८ (-१.०६%)
निफ्टी २४,६८३.९० -२६१.५५ (-१.०५ %)
तेल ६५.४७ -०.११%
डॉलर ८५.६३ २१ पैसे