Sensex: मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सलग सहाव्या सत्रात तेजीवाल्यांचा जोर कायम आहे. आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या ‘ब्लू-चिप’ कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा एकदा ८२,००० अंशांच्या पातळीवर बंद होण्यास यशस्वी ठरला.

गुरुवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४२.८७ अंशांनी वधारून ८२,०००.७१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३७३.३३ अंशांची भर घालत सत्रात ८२,२३१.१७ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३३.२० अंशांची वाढ झाली आणि तो २५,०८३.७५ पातळीवर बंद झाला.

प्रस्तावित वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सुधारणा आणि अलीकडेच देशासह आघाडीच्या कंपन्यांच्या मानांकनात सुधारणा केल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. जीएसटी दर सुसूत्रीकरणावरील मंत्रिगटाने केंद्र सरकारच्या ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोनस्तरीय रचना स्वीकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. जीएसटी परिषद पुढील महिन्यात या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे बाजारतज्ज्ञांनी सांगितले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांचे समभाग तेजीसह स्थिरावले. मात्र पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि अदानी पोर्ट्स यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.

पहिल्या तिमाहीअखेर कंपन्यांच्या निराशाजनक आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मूल्यांकनाबद्दलच्या निर्माण झालेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिले. शिवाय गुंतवणूकदारांचे आता अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल परिषदेमधील आगामी भाषणाकडे लक्ष लागले आहे. – विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड