मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) मंगळवारपासून सुरू होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी अनुसरलेल्या ‘थांबा आणि वाट पाहा’ भूमिकेतून, सप्ताहारंभीच्या सत्रात मंदावलेल्या व्यवहारात सेन्सेक्स ११९ अंशांनी घसरला, तर निफ्टीच्या सलग दिवसांच्या आगेकूच खंडीत झाली. माहिती-तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या नफावसुलीने सोमवारी शेअर बाजाराने नकारात्मक वळण घेतले.
पाच दिवसांच्या तेजीच्या मालिकेला तोडत, सेन्सेक्स ११८.९६ अंशांनी अर्थात ०.१५ टक्क्यांच्या मामुली फरकाने घसरून ८१,७८५.७४ वर दिवअखेर स्थिरावला. दिवसभरात त्याचा उच्चांक ८१,९९८.५१ आणि ८१,७४४.७० चा नीचांकी पाहता केवळ अडीचशे अंशांच्या निमुळत्या पातळीत तो हालता राहिला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ४४.८० अंशांनी (०.१८ टक्के) घसरून २५,०६९.२० वर बंद झाला.
विश्लेषकांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, बुधवारी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) मध्यरात्री अपेक्षित असलेल्या ‘फेड’च्या बैठकीच्या निर्णयाची बाजार वाट पाहत असल्याने बहुतांश गुंतवणूकदारांना कुंपणावर राहणेच पसंत केेले. परिणामी सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांत मोठे फेरबदल न होता, ते स्थिर राहिले. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच ‘फेड’कडून व्याजदरात कपातीची अपेक्षा केली जात आहे. पाव टक्क्यांची कपात बाजाराने गृहित धरली असली तरी भविष्यासंबंधी फेडप्रमुखांचे समालोचनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
सोमवारच्या व्यवहारात, सेन्सेक्समधील महिंद्र अँड महिंद्र, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन, सन फार्मा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र आणि पॉवर ग्रिड हे प्रमुख घसरणीत राहिलेले शेअर होते. मागील आठवड्यातील तेजीनंतर आयटी निर्देशांकात नफावसुली दिसून आली, याचा फटका सर्वच प्रमुख आयटी शेअरना बसला. या उलट बजाज फायनान्स, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे वधारलेले शेअर होते. तथापि व्यापक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण होते आणि मिड व स्मॉलकॅपमध्ये चोखंदळ खरेदीमुळे बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी, तर मिडकॅप निर्देशांक ०.४० टक्क्यांनी वधारला.
ट्रम्प टॅरिफचा धक्का विस्मृतीत अमेरिकेने लादलेले ५० टक्के टॅरिफ आणि त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नकारात्मक परिणाम या धक्क्यातून बाजार सावरलेला दिसत आहे. विशेषत: जीएसटी दर कपातीतून देशांतर्गत मागणीला अपेक्षित असलेली मजबूत चालना पाहता गुंतवणूकदार सुखावलेले दिसून येतात. यातून पुढील काळात कंपन्यांच्या मिळकत कामगिरीला मिळू शकणारी उभारी आणि अमेरिकेशी व्यापार कराराबद्दलचा नव्याने जागा झालेला आशावाद या गोष्टी गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला आधार देणाऱ्या ठरल्या आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.