मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात मंदीवाल्यांचा जोर कायम असून सप्ताहअखेर सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. मुख्यतः परदेशी गुंतवणूकदारांकडून अविरत सुरू असलेला समभाग विक्रीचा मारा आणि वित्त, माहिती-तंत्रज्ञान (आयटी), तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा लावल्याने शुक्रवारी सेन्सेक्स ७२१ अंशांनी घसरला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७२१.०८ अंशांची घसरण झाली आणि तो दिवसअखेर ८१,४६३.०९ या महिन्याच्या नीचांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७८६.४८ अंश गमावत ८१,३९७.६९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२५.१० अंशांनी घसरून २४,८३७ या महिन्याच्या तळाला बंद झाला.

आशियाई आणि युरोपीय बाजारातील कमकुवत कलामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवरही परिणाम झाला, असे विश्लेषकांनी सांगितले. कंपन्यांचे असमाधानकारक तिमाही आर्थिक निकाल आणि जागतिक बाजारातील मंदावलेले संकेत यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात व्यापक विक्री झाली. लार्ज-कॅप समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या धोरणामुळे घसरणीचा दबाव वाढला, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

घसरणीची प्रमुख कारणे काय?

१. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत अनिश्चितताः

आयात कराच्या भिंती दूर करणारा ब्रिटनबरोबर ऐतिहासिक मुक्त व्यापार करार भारताने गुरुवारी केला असला, तरी अमेरिकेशी अशाच स्वरूपाच्या व्यापार तहाच्या शक्यतेबाबत अनिश्चितता कायम असून, त्या संबंधाने १ ऑगस्ट ही अंतिम मुदतही आठवड्यावर येऊन ठेपली आहे. वॉशिंग्टनमध्ये भारताचे शिष्टमंडळ तळ ठोकून असले तरी कृषी आणि दुग्ध उत्पादनावरील आयात शुल्काचा मुद्दा हा या वाटाघाटीतील मोठा अडसर ठरल्याचे दिसत आहे.

२. वित्तीय सेवा समभागांमध्ये विक्री

बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांची पत गुणवत्ता घसरल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये दिसून आले. परिणामी या कंपन्यांच्या समभागांतील घसरगुंडीची लागण सर्वच वित्तीय सेवा आणि बँकांच्या समभागांनाही झाल्याचे आढळून आले.

३. विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची शेअर बाजाराकडे पुन्हा पाठ फिरली असून, गत चार सत्रांमध्ये त्यांनी एकूण ११,५७२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. जागतिक बाजारपेठेतील नरमाईचा कल त्यांच्या विक्रीला चालना देणारा ठरला आहे.

४. प्रतिकूल जागतिक घडामोडी-

आशियाई बाजारपेठेत, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले तर दक्षिण कोरियाचा निर्देशांक कोस्पी सकारात्मक पातळीवर स्थिरावला. युरोपीय आणि अमेरिकी बाजारपेठेत गुरुवारी संमिश्र वातावरण होते. भारत आणि ब्रिटनने गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला, जो पुढील वर्षापासून सुरू होईल, ज्यामुळे ९९ टक्के भारतीय निर्यात ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त होईल, तर वाहने आणि व्हिस्कीसारख्या ब्रिटिश उत्पादनांवरील शुल्क कमी होईल. जास्त कर लावण्यावरील अमेरिकेच्या स्थगितीच्या काही दिवस आधी झालेल्या या कराराचे उद्दिष्ट २०३० पर्यंत जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांमधील ५६ अब्ज डॉलरचा व्यापार दुप्पट करण्याचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घसरले; काय वाढले?

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, बजाज फायनान्सच्या समभागात ४.७३ टक्क्यांनी घसरण झाली. पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टेक महिंद्र, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट्स यांनी देखील गुंतवणूकदारांची निराशा केली. मात्र पडत्या बाजारात, सन फार्मा आणि भारती एअरटेल यांची कामगिरी चमकदार राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी २,१३३.६९ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) २,६१७.१४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.