मुंबई: माहिती-तंत्रज्ञान समभागांतील विक्री आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेतला जात असल्याने, भांडवली बाजाराचे प्रमुख सेन्सेक्स आणि निफ्टीतील घसरणीची मालिका सोमवारी सलग चौथ्या सत्रात सुरू राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सोमवारचा दिवस सरत असताना काही तोटा भरून काढला असला तरी, तो २४७.०१ अंशांच्या (०.३० टक्के) नुकसानीसह ८२,२५३.४६ वर दिवसअखेर स्थिरावला.

सत्रांतर्गत त्यातील घसरण ४९०.०९ अंशांपर्यंत विस्तारली होती आणि ८२ हजारांची पातळीही सेन्सेक्सकडून तोडली जाण्याची भीती बाजारात काही काळ निर्माण झाली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने २५ हजारांच्या पातळीवर तग धरण्यात यश मिळविले आणि ६७.५५ अंशांच्या (०.२७ टक्के) घसरून तो २५,०८२.३० वर दिवसअखेरीस बंद झाला.

मागील चार सत्रातील अर्थात ९ जुलैपासून सुरू असलेल्या घसरणीतून, सेन्सेक्स जवळपास १,४६० अंशांनी किंवा १.७५ टक्के आणि निफ्टी ४४० अंशांनी किंवा १.७३ टक्क्यांनी घसरला आहे. बाजाराकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५,१०४.२२ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली होती.

सोमवारच्या सत्रात सेन्सेक्समधील, एशियन पेंट्स सर्वात जास्त १.५८ टक्क्यांनी घसरला. या शिवाय टेक महिंद्र, बजाज फायनान्स, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा मोटर्स यांचा घसरलेल्या कंपन्यांमध्ये समावेश होता. त्या उलट इटर्नल, टायटन, महिंद्र अँड महिंद्र आणि आयटीसी हे वाढत्या कंपन्यांमध्ये होते.

व्यापक बाजारात मात्र एकंदरीत खरेदीचे सकारात्मक वातावरण दिसून आले. परिणामी मुख्य निर्देशांक घसरणीत असतानाही, बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६७ टक्क्यांनी वधारला आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५७ टक्क्यांनी वधारला. मुंबई शेअर बाजारात २,०५४ समभागांचे मूल्य वाढले, तर घसरणीत असलेल्या समभागांची संख्या जवळपास सारखीच म्हणजेच २,१३७ अशी होती.

अमेरिकी आयात कराबाबत अनिश्चितता आणि तिमाही निकाल हंगामाची सुरुवात मंदावलेली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये साशंकता आणि सावधगिरीचे वातावरण आहे. शिवाय बाजाराचे मूल्यांकनही उच्च पातळीवर असल्याने परदेशी गुंतवणूकदारही या अंगाने अधिक संवेदनशील बनले आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचे पथक वॉशिंग्टनला पोहोचले असून, सोमवारपासून वाटाघाटी सुरू होतील. यातून नेमका कोणता तोडगा पुढे येतो, ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने उत्सुकतेची बाब असेल आणि बाजाराचा आगामी कलही ती निर्धारीत करेल.