मुंबई : कंपन्यांच्या मजबूत तिमाही कामगिरीने निर्माण केलेल्या चैतन्याला, देशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून मिळालेली दमदार खरेदीची जोड ही स्थानिक बाजारात तेजीवाल्यांना बळ देणारी ठरली. परिणामी सोमवारी सलग सहाव्या सत्रात बाजार वधारला आणि प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ३८८ अंशांची कमाई केली, तर निफ्टीने २६,००० अंशांचा स्तर पुन्हा कमावला.
सलग सहाव्या दिवशी तेजीची हिरवळ बाजारात टिकून राहिली. चांगल्या बातम्यांचा दरवळ आणि देशी-विदेशी गुंतवणुकीने खतपाणी घालण्याची मालिका सुरू राहिल्याने हे शक्य झाले. सप्ताहारंभीच्या सत्राअखेरीस, सेन्सेक्स ३८८.१७ अंशांनी (०.४६ टक्के) वधारून ८४,९५०.९५ वर बंद झाला.
दिवसभरात, त्याने ४२५.३१ अंशांच्या मुसंडीसह ८४,९८८.०९ च्या उच्चांकाला गाठले, परंतु ८५ हजारांची पातळी त्याला हुलकावणी देणारी ठरली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०३.४० अंशांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी वाढून २६,०१३.४५ वर स्थिरावला.
स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार, बरोबरीनेच परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू झालेल्या जोरदार खरेदीने तेजीला चालना मिळाली, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले. ‘बाजाराने सकारात्मक वेग कायम ठेवला असला तरी अमेरिकेशी संभाव्य व्यापार करार हा बाजारासाठी एक महत्त्वाचा उत्प्रेरक ठरेल. ज्यावर सर्व गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या चांगल्या कमाईमुळे मुख्यत: मिडकॅप्सना बळकटी मिळाली आहे. मध्यम श्रेणीतील कंपन्यांच्या कमाईत भविष्यात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे,’ असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी निरीक्षण नोंदविले.
मिडकॅप्सना जोमाने बहर
सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांच्या तुलनेत मध्यम व तळच्या श्रेणीतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५९ टक्क्यांनी वधारला. उल्लेखनीय म्हणजे सर्व क्षेत्रीय निर्देशांक देखील तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारावर एकूण २,२११ शेअर्समध्ये घसरण झाली, तर २,०८२ शेअर्स वधारले.
सेन्सेक्समधून, इटर्नल, मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, टायटन, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो हे वधारलेले समभाग होते. त्या उलट, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे समभाग मागे पडले.
